शिवसेना उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची आज पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली आहे. लातूरच्या औसा हेलीपॅडवर निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी ठाकरेंच्या बॅगा तपासल्या आहेत. उद्धव ठाकरे हे औसा मतदारसंघातील उमेदवार दिनकर माने यांच्या प्रचारासाठी गेले होते. यावेळी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी आज देखील त्यांची बॅग तपासली. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून संताप व्यक्त केला. तसंच आत्तापर्यंत कितीजणांची बॅग तपासली? असा प्रश्न देखील उपस्थित केला. काल वणीमध्ये प्रचारासाठी गेल्यावर देखील उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी केली होती. त्याचा व्हिडिओ ठाकरेंनी जाहीर केला होता. त्यानंतर आज देखील उद्धव ठाकरे औसा येथे गेले असतात हेलीपॅडवर पुन्हा एकदा त्यांच्या बॅगची तपासणी झाली. याचा व्हिडिओ उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यावेळी ठाकरेंनी देखील निवडणूक आयोग कर्मचाऱ्यांचे खिसे, पाकीट आणि ओळखपत्र तपासल्याचं दिसून आलं आहे. तसंच तुम्ही महाराष्ट्रातले आहात, महाराष्ट्रासाठीच जगायचं आणि मारायचं. इतर राज्यातील लोकांची चाकरी करायची नाही, असा टोलाही यावेळी या कर्मचाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी लगावल्याचं व्हिडिओमधून दिसून येत आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणावर उद्धव ठाकरेंनी औसाच्या सभेत बोलताना संताप व्यक्त केला आहे. 'मोदींचा दौरा असतो तेव्हा इतर पक्षाच्या नेत्यांसाठी विमानतळ बंद केलं जातं. रस्त्यावरून लोकांना बंदी केली जाते. मात्र माझी जशी येताना बॅग तपासता तसंच मोदी आणि शहा यांची बॅग महाराष्ट्रातून जाताना तपासा. ते महाराष्ट्र लुटून नेत आहेत', अशी टीका ठाकरेंनी केली आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.