राज्यात महायुतीचं सरकार असून, मित्रपक्ष भाजपनं शिंदे गटाला पहिला धक्का दिल्याचं बोललं जात आहे. विधानपरिषद सभापतिपदासाठी एकनाथ शिंदे स्वतः आग्रही असताना, भाजपकडून राम शिंदे यांचा विधानपरिषद सभापतिपदासाठी अर्ज भरण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा अर्ज भरण्यात आला.
विधानपरिषद सभापतिपद मिळावं यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आग्रही होती. या पदासाठी नीलम गोऱ्हेंचं नाव चर्चेत येत होते. आता भाजपकडून राम शिंदे यांनी अर्ज भरल्यानंतर मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नीलम गोऱ्हेंना ही जबाबदारी मिळाली असती तर आनंद झाला असता. त्या अत्यंत प्रगल्भ नेत्या आहेत. सभागृह त्या चांगल्या पद्धतीने चालवत आहेतच. त्या उपसभापती आहेतच, असं कायंदे म्हणाल्या.
राम शिंदे यांचा एकच अर्ज सादर करण्यात आल्यामुळं ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्ज छाननीनंतर उद्या विधानपरिषदेत अर्ज सादर केला जाणार आहे. उपसभापति नीलम गोऱ्हे या प्रस्ताव मांडणार आहेत. बहुमताने राम शिंदे यांची निवड होण्याची शक्यता आहे.
सभापतिपदाची निवडीची अधिकृत घोषणा उद्या होणार असली तरी, आता फक्त औपचारिकता उरली आहे, असं बोललं जात आहे. विरोधकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे कुणीही नाराज असण्याचा प्रश्नच येत नाही, जुनं काय घडलं ते मागू राहू द्यायचं आणि आज दिवस चांगला आहे, पुढे जाऊया, अशी प्रतिक्रिया राम शिंदे यांनी दिली.
सभापतिपद हे नक्कीच जबाबदारीचं आहे. सगळ्यांना न्याय देण्याचा आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न असेल, असेही राम शिंदे यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.