Ayush mhatre ruled out ipl 2026 csk injury news : यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. त्यात महेंद्रसिंग धोनी अद्याप मैदानात आलेला नाही. विजयासाठी संघर्ष करत असलेला चेन्नईचा संघ फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी अशा तिन्ही आघाड्यांवर अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही. आयपीएलमध्ये खडतर प्रवास सुरू असतानाच आता आणखी एक धक्का संघाला बसला आहे. संघाचा स्टार फलंदाज आणि आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये संघाकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आयुष म्हात्रे हा दुखापतीमुळं उर्वरित आयपीएल स्पर्धा खेळू शकणार नाही.
आयुष म्हात्रे हा चेन्नईच्या आघाडीच्या फलंदाजीचा कणा आहे. या आयपीएल मोसमात (CSK in IPL 2026) आयुषने संघाकडून खेळताना सर्वाधिक धावा केल्या आहेत. संघाचा भरवशाचा फलंदाज असलेला आयुष दुखापतीमुळं त्रस्त आहे. आता तो उर्वरित आयपीएल खेळणार नाही. संघाला गरज असताना आयुषचे संघात नसणे हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
आयुष म्हात्रेबाबत चेन्नई सुपर किंग्जने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. (chennai super kings injury update ayush mhatre out) आयुष म्हात्रेला गंभीर दुखापत झाली आहे. त्यातून सावरण्यास सहा ते १२ आठवड्यांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे तो पुढील आयपीएल सामने खेळू शकणार नाही, असं पोस्टमध्ये नमूद केलं आहे. १८ एप्रिलला हैदराबाद संघाविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. (ayush mhatre hamstring injury ipl 2026) त्यामुळे आयुष आयपीएल २०२६ मधून बाहेर झाला आहे. आयुष लवकरात लवकर बरा होवो, अशी प्रार्थना आम्ही करतो, असं पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
आयुष म्हात्रे हा आयपीएल २०२६ मध्ये ६ इनिंग खेळला असून, ३३.५० च्या सरासरीने आणि १७७.८७ च्या स्ट्राइक रेटने त्याने २०१ धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. पंजाब किंग्जविरोधात त्याने ७३ धावांची खेळी केली. तर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ५९ धावा केल्या होत्या. म्हात्रेची जागा भरून काढण्यासाठी चेन्नईकडे उर्विल पटेलसारखा खेळाडू आहे. पण तो आतापर्यंत एकही सामना खेळला नाही. आयुष बाहेर गेल्यानं पटेलला संधी मिळू शकते. आता चेन्नईचा संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी देतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. नाथन एलिस, खलील अहमद हे दोन महत्वाचे खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. तर अनुभवी फलंदाज महेंद्रसिंग धोनी दुखापतीतून सावरलेला नाही. तो आतापर्यंत एकही सामना खेळू शकलेला नाही. सध्या ऋतुराज गायकवाड याच्याकडे चेन्नई संघाचं नेतृत्व आहे. आतापर्यंत फक्त दोनच सामन्यांत विजय मिळाला आहे. तर चार सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. संघाचे चार गुण झाले असून, पॉइंट टेबलमध्ये संघ आठव्या स्थानी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.