भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. स्कायरूट एरोस्पेस या भारतीय खासगी कंपनीने विकसित केलेलं 'विक्रम-1' हे रॉकेट श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीपणे अवकाशात झेपावलंय. भारतातील खासगी कंपनीने विकसित केलेल्या ऑर्बिटल श्रेणीतील रॉकेटच्या महत्त्वाच्या उड्डाणांपैकी हा एक मोठा टप्पा मानला जातोय. त्यामुळे देशाच्या अंतराळ क्षेत्रासाठी हा अभिमानाचा क्षण ठरलाय.
सकाळी सुमारे ११.३० वाजता विक्रम-1चं प्रक्षेपण करण्यात आलं. नियोजित वेळेनुसार रॉकेटने सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केले आणि त्यावरील उपग्रह योग्य कक्षेत (ऑर्बिट) सोडण्यात आला. या संपूर्ण मोहिमेवर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी बारकाईने लक्ष ठेवलं होतं. या मोहिमेला 'आगमन' असं नाव देण्यात आलंय.
ही मोहीम केवळ स्कायरूट एरोस्पेससाठीच नाही तर भारतातील संपूर्ण खासगी अंतराळ उद्योगासाठीही अत्यंत महत्त्वाची मानली जातेय. केंद्र सरकारने २०२० मध्ये अंतराळ क्षेत्रात मोठे बदल केले होते. त्यानंतर खासगी कंपन्यांनाही रॉकेट तयार करणं, उपग्रह विकसित करणं आणि प्रक्षेपण सेवा देण्याची संधी मिळाली. त्यानंतर भारतीय खासगी कंपन्यांनी या क्षेत्रात वेगाने काम करण्यास सुरुवात केली आहे.
यापूर्वी स्कायरूटने २०२२ मध्ये 'विक्रम-S' हे सब-ऑर्बिटल रॉकेट यशस्वीरित्या उड्डाण केलं होते. मात्र त्या मोहिमेत कोणताही उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आला नव्हता. यावेळी मात्र उद्दिष्ट वेगळं आहे. विक्रम-1 हे रॉकेट विविध छोटे उपग्रह पृथ्वीपासून सुमारे ४५० किलोमीटर उंचीवरील लो-अर्थ ऑर्बिटमध्ये (LEO) पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आलंय. ही तीन मोहिमांपैकी पहिली मोहीम आहे. त्यानंतर हे रॉकेट नियमित कमर्शियल लॉन्चसाठी वापरण्याची तयारी केली जाणार आहे.
सब-ऑर्बिटल आणि ऑर्बिटल रॉकेटमध्ये मोठा फरक आहे. सब-ऑर्बिटल रॉकेट अवकाशाच्या सीमेपर्यंत जाऊन पुन्हा पृथ्वीवर परत येतं. मात्र ऑर्बिटल रॉकेट उपग्रहाला इतका वेग देऊन पृथ्वीभोवतीच्या ठराविक कक्षेत फिरत राहतं. विक्रम-1चं मिशन पूर्णपणे यशस्वी ठरल्यास पृथ्वीच्या कक्षेत उपग्रह यशस्वीपणे पोहोचवणारी भारतीय खासगी कंपनी म्हणून स्कायरूटची नोंद होणार आहे.
विक्रम-1 हे चार टप्प्यांचं रॉकेट आहे. त्याच्या पहिल्या तीन टप्प्यांमध्ये वेगळ्या Solid Fuel वापरण्यात आलंय. चौथ्या टप्प्यात Liquid Fuel वर चालणारं इंजिन बसवण्यात आलंय. गरज पडल्यास हे इंजिन पुन्हा सुरू करता येतं. त्यामुळे उपग्रहाला त्याच्या अचूक कक्षेत सोडणं अधिक सोपं होतं. हे रॉकेट विशेषतः लहान उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी तयार करण्यात आलंय.
हे मिशन यशस्वी ठरल्यास भारतातील खासगी अंतराळ उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे. भविष्यात भारतातून अधिक व्यावसायिक उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याचा मार्गही मोकळा होईल. त्यामुळे या मोहिमेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.