रश्मी पुराणिक
Sambhajiraje Chhatrapati News : किल्ले रायगडावर (Raigad) शिवसमाधी समोर पिंडदान करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर शिवप्रेमींमध्ये पिंडदान करणाऱ्यांविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. काही शिवभक्तांनी हा प्रकार उघडकीस आणला. रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी पिंडदान केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.
रायगडावर शिवाजीर महाराजांच्या समाधीस्थळी काल पिंडदानाचा जो प्रकार घडला, गेला काही महिन्यांत काही लोकांनी संशयास्पद विधी केल्याचे आढळून आले. या प्रकाराला अटकाव घालण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ कराव्यात, यासाठी रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे.
श्री एकनाथजी शिंदे,
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य
माननीय महोदय,
समस्त देशाचे शक्तिस्थळ असलेल्या दुर्गराज रायगडावर गेल्या काही महिन्यांत श्री शिवछत्रपती महाराजांना अभिवादन करण्याव्यतिरिक्त इतर काही संशयास्पद विधी केल्याचे आढळून येत आहे. अशा प्रकारांमुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या जाऊन असंतोषाचे वातावरण निर्माण होऊ शकते. करिता संपूर्ण दुर्गराज रायगडवर व विशेषत: राजसदर, बालेकिल्ला, होळीचा माळ व श्री शिवछत्रपती महाराजांचा समाधी परिसर याठिकाणी श्री शिवछत्रपती महाराजांना अभिवादन करण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचे विधी करण्यास अटकाव करण्यात यावा. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गृह विभाग व केंद्रीय पुरातत्व विभागास आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात व तात्काळ तशी व्यवस्था अंमलात आणावी.
कळावे.
आपला,
संभाजी छत्रपती
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.