इंदापूर तालुक्यातील मौजे राजवडी येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ साईडपट्टीच्या भरावाचे काम सुरू असताना माती-मुरुमाचा ढिगारा कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला असून, एक मजूर जखमी झाला आहे.
जखमी मजुराला तातडीने बाहेर काढून इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. या दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले असून, घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
आज सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. उड्डाणपुलाजवळ साईडपट्टीच्या भरावाचे काम सुरू असताना अचानक माती-मुरुमाचा ढिगारा कोसळला. त्यावेळी घटनास्थळी तीन मजूर काम करीत होते. त्यापैकी एका मजुराने प्रसंगावधान राखून स्वतःची सुटका करून घेतली. उर्वरित दोन मजुरांपैकी एकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, तर एका मजुराचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचाव व मदतकार्य हाती घेऊन जखमी मजुराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रशासनाकडून घटनेच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.