पुण्यात खड्ड्यांमुळे शाळकरी मुलाचा मृत्यू
वडिलांसोबत ट्युशनला जाताना शाळकरी मुलाचा अपघाती मृत्यू
पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे शाळकरी मुलाचा जीव गेला
अगदी गावापासून ते मुंबई, पुणे, नाशिक सारख्या शहरांमध्ये जागोजागी पडलेले खड्डे सामान्यांसाठी मृत्यूचे सापळे बनलेत. पुणे मनपा हद्दीत महाळुंगेमध्ये रिषभ पाटोळे या 11 वर्षीय मुलाचा खड्ड्यांमुळे मृत्यू झालाय. एका जन्मदात्या बापाला त्याच्या डोळ्यासमोरच मुलाचा दुर्दैवी अंत पाहावा लागलाय. शिकवणीसाठी वडीलांबरोबर जात असताना खड्ड्यांमुळे दुचाकी घसरली आणि रिषभ ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला. ढिम्म यंत्रणेला असे किती जीव गेल्यानंतर जाग येणार ? असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारलाय.
पुण्यात हा काही पहिलाच अपघात नाही. रस्ते अपघातात किती जणांचा बळी गेलाय ते पाहूया. पुणे शहरात 2025 मध्ये 1,392 अपघात झालेत. त्यामध्ये 302 जणांचा मृत्यू झालाय. 2026 मध्ये जानेवारी ते ऑगस्ट या 8 महिन्यात 863 अपघात होऊन 198 जणांचा बळी गेलाय. महाळुंगे अपघातात घटनास्थळाची पाहणी करताना राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. PMRDA आणि PMC च्या वादात रस्त्याचं काम रखडल्याचा दावा त्यांनी केलाय.
मात्र शाळकरी मुलाचा बळी गेलेला असताना आमदार महोदय काय म्हणतायेत पाहा. एकीकडे लोकप्रतिनीधींच्या असंवेदनशील वक्तव्याने पीडितांच्या जखमेवर मीठ चोळले जात असताना दुसरीकडे खुद्द पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खड्ड्यांवर टिप्पणी केली आहे. 2 महिन्यात 29 जणांचे जीव गेलेत. नागरिकांना पायी चालणं कठीण आहे, असं जिल्हाधिकारी म्हणतायेत.
मुलाचा मृत्यू झाल्यानंतर बावधन पोलिसांनी ट्रकचा धक्का लागलेला नसताना ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. चोर सोडून संन्यासाला फाशी दिल्याचा प्रकार असल्याचा संताप व्यक्त होतोय. रस्त्याची चाळण करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कधी कारवाई होणार? असा सवाल विचारला जातोय.
पुणेकरांच्या कष्टाचा पैसा ठेकेदारांनी अक्षरश लुटलाय. एक दोन नव्हे तर चक्क २५४ कोटी खर्च करुन ही पुणेकरांच्या नशिबी खड्डेच आलेत. महापालिका-कंत्राटरांच्या अभद्र युतीतून लूट सुरु असल्याचा आरोप होतोय. जगात नावलौकिक असलेल्या पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरातही रस्त्यांची मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झालीये. पुणे शहरात सर्वत्र नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. मुर्दाड यंत्रणा आणखी किती जणांचा बळी घेणार ? हाच संतापाचा सूर सर्वत्र उमटतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.