सचिन जाधव, साम टीव्ही
पुणे: जावई म्हटले की सासुरवाडीत मिळणारा मान-पान, पुरणपोळी आणि आग्रहाचे जेवण डोळ्यासमोर येते. मात्र, पुण्यातील बिबवेवाडी आणि कोंढवा परिसरात या परंपरेला छेद देणाऱ्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. पत्नीच्या माहेरी गेलेल्या दोन वेगवेगळ्या जावयांना सासरच्या नातेवाइकांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे.
एका प्रकरणात मोबाइल घेण्यासाठी गेलेल्या जावयाला कपडे धुण्याच्या बॅटने मारहाण करण्यात आली, तर दुसऱ्या प्रकरणात मेहुण्याने केलेल्या हल्ल्यात जावयाच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले. दोन्ही प्रकरणांत संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत. बिबवेवाडीत शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित व्यक्ती स्वतःचा मोबाइल आणण्यासाठी पत्नीच्या माहेरी गेली होती. मोबाइलची मागणी करताच सासरच्यांनी कपडे धुण्याच्या बॅटने तसेच लाकडी स्टम्पने त्याला मारहाण केली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना कोंढव्यातील मिठानगर परिसरात शुक्रवारी रात्री घडली. पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी सासरी गेलेल्या जावयाला जुन्या वादातून सासरच्या नातेवाइकांनी शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर तो तेथून निघून गेला. मात्र, त्याला पुन्हा फोनवरून शिवीगाळ करण्यात आली. याबाबत जाब विचारण्यासाठी तो पुन्हा सासरी गेला असता, त्याच्यावर हल्ला करण्यात आला. मेहुण्याने हातातील लायटरने नाकावर; तसेच डोक्यावर मारहाण केल्याने त्याच्या नाकाचे हाड फॅक्चर होऊन तो गंभीर जखमी झाला या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.