राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग
सुप्रिया सुळे, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे महत्त्वाचे नेते दिल्लीत दाखल
पार्थ पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील जिजाऊ निवासस्थानी आमदारांची महत्त्वाची बैठक
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. एकीकडे शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. एकीकडे पुण्यात पार्थ पवारांनी आमदारांची बैठक बोलावली असून दुसरीकडे दोन्ही पक्षातील महत्त्वाचे नेते दिल्लीला गेल्याची साम टीव्हीच्या सूत्रांची माहिती आहे. या वाढलेल्या भेटीगाठींनी विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू असतानाच दोन्ही गटांचे काही महत्त्वाचे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे. संसदेच्या बैठकीसाठी हे नेते दिल्लीत गेल्याची माहिती साम टीव्हीच्या सूत्रांनी दिली आहे. मात्र, विलिनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर या नेत्यांच्या दिल्ली दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, पुण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे. पार्थ पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील जिजाऊ निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मंत्री दत्तात्रय भरणे, शिरूर-हवेलीचे आमदार माऊली कटके आणि भोरचे आमदार शंकर मांडेकर उपस्थित आहेत. दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असताना या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा आमदारांना फोन केले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या फोनद्वारे आमदारांची विलिनीकरणाबाबतची भूमिका जाणून घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे दिल्लीतील नेत्यांच्या भेटी आणि पुण्यातील आमदारांची बैठक यामुळे विलिनीकरणाच्या चर्चांना आणखी वेग आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.