Mumbai local murder case 
मुंबई/पुणे

Mumbai Local : लोकलमधील हत्येप्रकरणी आरोपीचा धक्कादायक खुलासा; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Mumbai local murder case : मुंबई लोकलमधील मयंक लोहार हत्या प्रकरणात अटक आरोपी रोशन सुवर्णाने पोलिसांसमोर धक्कादायक दावे केले आहेत. वाद, मारहाण, मद्यधुंद अवस्था आणि चाकू हल्ल्याबाबत आरोपीच्या जबाबातील महत्त्वाचे तपशील समोर आले आहे.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

पश्चिम रेल्वेवरील लोकल ट्रेनमध्ये २२ वर्षीय मयंक लोहार याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ३० वर्षीय रोशन सुवर्णाने पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात अनेक धक्कादायक दावे केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, आरोपीने केलेले सर्व दावे तपासाअंती सिद्ध होणे अद्याप बाकी असून त्याची पडताळणी सुरू असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, अंधेरीतील कार्गो परिसरात बारकोड लेबलिंगचे काम करणारा रोशन सुवर्णा हा घटनेच्या दिवशी दिवसभर मद्यप्राशन करत होता. त्याने मोठ्या प्रमाणात दारू प्यायल्याचे आपल्या जबाबात नमूद केले आहे. सायंकाळी अंधेरी स्थानकातून नालासोपारा दिशेने जाणारी लोकल पकडून तो घरी निघाला होता.

आरोपीच्या जबाबानुसार, जोगेश्वरी आणि मालाड स्थानकादरम्यान मुसळधार पावसामुळे डब्यात पाणी येत होते. त्यामुळे काही प्रवाशांनी दरवाजा बंद करण्यास सांगितले. त्याचवेळी मयंक लोहार यानेही दरवाजा बंद करण्याची सूचना केली. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. आरोपीने मयंकला शिवीगाळ केल्याचा तसेच प्रत्युत्तरादाखल मयंकनेही शिवीगाळ केल्याचा दावा केला आहे.

वाद वाढल्यानंतर मयंकने आपल्या डाव्या डोळ्यावर जोरदार ठोसा मारल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले आहे. यानंतर काही प्रवाशांनीही आपल्याला मारहाण केल्याचा दावा त्याने केला. या घटनेनंतर संतापाच्या भरात आपण बॅगेत ठेवलेला चाकू बाहेर काढून मयंकवर वार केल्याचे आरोपीने कबूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आरोपीच्या म्हणण्यानुसार, चाकूचे वार होताच डब्यातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, लोकल बोरिवली स्थानकाजवळ पोहोचत असताना ट्रेनचा वेग कमी झाल्याचा फायदा घेत त्याने चालत्या ट्रेनमधून उडी मारली. त्यानंतर रेल्वे सबवेमधून पश्चिमेकडे पळून जाताना हत्येसाठी वापरलेला चाकू फेकून दिल्याचेही त्याने जबाबात नमूद केले आहे.

तपासादरम्यान आणखी एक बाब समोर आली आहे. आरोपीने आपल्या एका मित्राकडे दोन चाकू पाहिले होते. त्यापैकी एक चाकू घरी ठेवला होता, तर दुसरा तो नेहमी बॅगेत बाळगत असल्याचा दावा त्याने केला आहे. मद्यधुंद अवस्थेत तो सहसा ओला किंवा उबेरने प्रवास करत असे; मात्र त्या दिवशी लोकलमध्ये गर्दी कमी असेल असे वाटल्याने रेल्वेने प्रवास केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

दरम्यान, पोलिसांकडून आरोपीच्या जबाबातील प्रत्येक दाव्याची स्वतंत्र पडताळणी केली जात असून सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी प्रवाशांचे जबाब आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास पुढे नेण्यात येत आहे. त्यामुळे आरोपीने केलेल्या दाव्यांमधील सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित रिंगरोडच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम

51 कर्मचारी-अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई! प्रशासकीय वर्तुळात खळबळ; महापालिकेत नेमकं काय घडलं?

गावरान स्टाईल कवळा भाजी बनवण्याची सोपी रेसिपी

Thyroid symptoms: थायरॉईडची समस्या असेल तर अचानक पायांमध्ये दिसतील ही ६ लक्षणं

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, पगारासोबत HRA, भत्ते आणि पेन्शनमध्येही होऊ शकतात मोठे बदल

SCROLL FOR NEXT