मनोज तांबे, भाईंदर प्रतिनिधी
Mira Road Navratri News : नवरात्रोत्सवाचा आनंद आणि दांडियाचा उत्साह सुरू असताना मीरा रोडवरून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. गरबा-दांडिया खेळत असताना अचानक आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मीत रुपडा असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. (Meet Rupda death news)
नेमकी घटना काय घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, मीरा रोड येथील 'लोटस नवरात्रोत्सवात' सहभागी होण्यासाठी मीत रुपडा गेला होता. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तो अत्यंत उत्साहात गरबा आणि दांडिया खेळत होता. यादरम्यान, अचानक त्याच्या छातीत तीव्र दुखू लागले आणि तो जागेवरच खाली कोसळला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित लोकांमध्ये एकच खळबळ उडाली.
उपचारादरम्यान प्राण गमावले
तरुणाला खाली कोसळताना पाहून उपस्थितांनी तातडीने धाव घेत त्याला उपचारासाठी जवळच्या भाईंदर येथील 'तुंगा रुग्णालयात' दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. उपचारापूर्वीच किंवा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद
याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुणाचा मृत्यू हा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानेच झाल्याची माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनलकर यांनी दिली आहे. अवघ्या ३० वर्षांच्या तरुण मुलाचा असा अचानक मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटुंबियांवर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.