संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही प्रतिनिधी
KDMC Ward Committee Elections: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) १० प्रभाग समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने वर्चस्व सिद्ध केले आहे. दहा प्रभाग समित्यांपैकी पाच समित्यांवर शिवसेनेचे सभापती विराजमान झाले. तर भाजपने चार समित्यांवर बाजी मारली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एका प्रभाग समितीचे सभापतीपद मिळाले आहे. या निकालामुळे केडीएमसीच्या प्रभाग समित्यांवर शिवसेनेचा दबदबा स्पष्ट झाला आहे.
महापालिकेच्या दहा प्रभाग समित्यांच्या सभापतीपदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. यापैकी 'अ', 'ड' आणि 'फ' या तीन प्रभाग समित्यांमध्ये प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या ठिकाणी बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. उर्वरित सात प्रभाग समित्यांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. काही ठिकाणी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे बिनविरोध निवडी झाल्या, तर काही ठिकाणी प्रत्यक्ष निवडणुकीत उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.
'क' प्रभाग समितीच्या सभापतीपदासाठी भाजपच्या मेघाली खेमा, शिवसेनेचे प्रतीक पेणकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) रमीज मणियार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, निवडणुकीदरम्यान प्रतीक पेणकर आणि रमीज मणियार यांनी माघार घेतल्याने भाजपच्या मेघाली खेमा यांची बिनविरोध निवड झाली.
'ह' प्रभाग समितीमध्ये भाजपच्या रवीना म्हात्रे, मनसेचे संदेश पाटील आणि शिवसेनेच्या रेखा म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, संदेश पाटील आणि रेखा म्हात्रे यांनी माघार घेतल्याने भाजपच्या रवीना म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाली.
दुसरीकडे, 'ग' प्रभाग समितीमध्ये भाजपच्या कविता म्हात्रे यांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे सूरज मराठे यांची बिनविरोध निवड झाली; तर 'इ' प्रभाग समितीमध्ये भाजपच्या रवीना माळी यांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे अर्जुन पाटील यांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 'ब' आणि 'आय' या दोन प्रभाग समित्यांच्या सभापतीपदासाठी उमेदवार दिले होते. मात्र, या दोन्ही ठिकाणी पक्षाच्या उमेदवारांना यश मिळाले नाही. 'ब' प्रभाग समितीवर शिवसेनेच्या (शिंदे गट) सुप्रिया भोईर यांनी सभापतीपद मिळवले, तर 'आय' प्रभाग समितीवर भाजपच्या सरोज राय यांनी बाजी मारली.
पक्षनिहाय विजयी सभापतींची यादी:
शिवसेना – ५:
'अ' प्रभाग – बंदेश जाधव
'ब' प्रभाग – सुप्रिया भोईर
'ग' प्रभाग – सूरज मराठे
'इ' प्रभाग – अर्जुन पाटील
'जे' प्रभाग – दर्शना काळे
भाजप – ४:
'क' प्रभाग – मेघाली खेमा
'फ' प्रभाग – मंदा पाटील
'ह' प्रभाग – रवीना म्हात्रे
'आय' प्रभाग – सरोज राय
मनसे – १:
'ड' प्रभाग – शीतल मंढारी
दहा प्रभाग समित्यांच्या निकालातून शिवसेनेने पाच सभापतीपदे मिळवत सर्वाधिक जागांवर वर्चस्व राखले आहे. भाजपने चार सभापतीपदे मिळवत आपली ताकद कायम ठेवली, तर मनसेने एका प्रभाग समितीवर विजय मिळवला. त्यामुळे केडीएमसीच्या प्रभाग समित्यांच्या राजकारणात शिवसेनेचे पारडे जड ठरले असून, आगामी महापालिका कारभारात या निकालाचे राजकीय महत्त्व अधोरेखित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.