रुपेश पाटील, पालघर
पालघर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वनगा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे शिंदे गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी पालघर दौऱ्यावर आले होते. याच दौऱ्यादरम्यान श्रीनिवास वनगा Shrinivas Vanga यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. या पक्षप्रवेशामुळे पालघर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर श्रीनिवास वनगा हे शिंदे गटावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. निवडणुकीच्या काळातही त्यांच्या भूमिकेमुळे पक्षांतर्गत मतभेद समोर आले होते. त्यांनी बंडखोरीची भूमिकाही घेतली होती. त्यानंतर ते पक्षाच्या घडामोडींपासून काहीसे दूर असल्याचे दिसून आले. गेल्या काही काळापासून वनगा यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, त्यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांचे लक्ष या घडामोडीकडे वेधले गेले आहे.
वनगा यांच्या भाजप प्रवेशामुळे पालघर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. विशेषतः शिंदे गटासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. आता श्रीनिवास वनगा यांना भाजपमध्ये कोणती जबाबदारी मिळणार आणि त्यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील इतर पक्षांच्या राजकारणावर काय परिणाम होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आगामी काळात पालघरच्या राजकारणात आणखी कोणत्या घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.