ऐन दिवाळीत देशातील अनेक राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. आज देशातील ९ राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने या राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. तर काही राज्यांमध्ये तापमानात चढ-उतार सुरू आहे. काही ठिकाणी थंडी पडली तर काही ठिकाणी उन्हाचा तडाका कायम आहे. महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरला असून थंडीची चाहूल लागली आहे.
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या ७ ईशान्येकडील राज्यांमध्ये पाऊस पडेल. त्यासोबतच हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमधील काही ठिकाणीही पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
१० ते १४ नोव्हेंबर दरम्यान अंदमान आणि निकोबारमधील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यासोबतच जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि अंदमान आणि निकोबारमध्ये खराब हवामानाचा अंदाज आहे. देशाच्या उर्वरित भागात हवामानात कोणताही मोठा बदल अपेक्षित नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानात प्रचंड वाढ झाल्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.
महाराष्ट्रातील तापमानात चढ-उतार सुरूच राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात थंडीची चाहूल लागली असून किमान तापमानाचा पारा १५ अंशांच्या खाली गेला आहे. सोमवारी निफाडमध्ये १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुणे, नाशिक, परभणी, गोंदिया आणि यवतमाळ याठिकाणी १५ अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंदी झाल्याने गारठा वाढला आहे. आज राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहिल असा अंदाज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.