Jayakwadi Dam Water Level Today: नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून बळीराजा सुखावला आहे. या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.
मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात गेल्या २४ तासांत दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आज सकाळपर्यंत जायकवाडीतील जलसाठा ३४.२८ टक्क्यांवर पोहचला आहे. (Latest Marathi News)
सध्या जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) १३ हजार क्यूसेक आवक सुरू आहे. पावसाअभावी यंदा मराठवाड्यात दुष्काळाचे सावट असताना जायकवाडी धरणाच्या वरच्या भागातील धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील काही भागाला थोडासा दिलासा मिळाला आहे.
नाशिक जिल्हयातील गंगापूर धरणासह अन्य धरणातून गोदावरीच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. या हंगामात नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने पाणी प्रवाहित झाले आहे. रविवारी जायकवाडीत १५ हजार ९२५ क्युसेक क्षमतेने आवक झाली.
नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शनिवारी नाशिकमधील (Nashik News) धरणसमूहातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदावरी नदीला महापूर आला. पुराचे पाणी शनिवारी मध्यरात्री जायकवाडी धरणात येऊन धडकले.
आता पावसाचा जोर मंदावल्याने नाशिक जिल्ह्यातील धरणसमूहातून होणारा विसर्ग कमी केला. गंगापूर धरणातून होणारा विसर्ग बंद करण्यात आल्याची माहिती आहे. दारणातून १ हजार १००, तर पालखेड ४३७, आळंदी २१०, कडवा ४२९ क्युसेक असा नाममात्र विसर्ग रविवारी सायंकाळी सुरू होता.
यामुळे नांदूर मधमेश्वर धरणातून २५ हजार क्यूसेक गोदावरीत होणारा विसर्ग ४ हजार ११७ क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे. दरम्यान, येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.