"संकटामागून संकटं आली आणि पुढेही येतील. पण संकटाला पुरून उरणारा शिवसैनिक पाठीशी आहे, तोपर्यंत मी लढत राहणार," असा ठाम विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. "उद्धव ठाकरे आदेश द्या असं सांगतात, पण बाळासाहेब कधीच आदेश देऊन गेलेत," अशी भावना व्यक्त करत त्यांनी कार्यकर्त्यांच्या निष्ठा आणि ताकदीला सलाम केला. शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते. दुसऱ्यांदा शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेय.
आपल्या नेहमीच्या शैलीत भाषणाची सुरुवात केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना भावूक साद घातली. "जमलेल्या माझ्या हिऱ्यापेक्षा मौल्यवान, शिवसैनिकांनो..." असा उल्लेख करत त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले. विरोधकांवर तोफ डागताना ते म्हणाले, "काहींना वाटले असेल की दुःखे आणि कष्टाने शिवसैनिक खचून गेला असेल. पण शिवसैनिक खचलेला नाही, उलट तो अधिक पेटून उठला आहे, असे ते म्हणाले"
काँग्रेस विलीनीकरणाच्या टीकेला सडेतोड उत्तर
शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार, अशी टीका करणाऱ्या विरोधकांचा उद्धव ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, "आम्हाला वाटलं शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार असं जे ओरडतात ना, त्यांना मी सांगतो की, आम्ही इतकी वर्षे भाजपसोबत राहूनही त्यांच्यात विलीन झालो नाही; तर काँग्रेसमध्ये काय विलीन होणार?" उलट विरोधकांवर खोचक टीका करताना ते पुढे म्हणाले, "आता परिस्थिती अशी दिसतेय की, भाजपच 'शिंदेसेनेत' विलीन होईल की काय, अशी भीती वाटू लागली असा टोला यावेळी ठाकरेंनी लगावला.
पक्षाच्या पाठीशी असलेल्या शक्तीचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, चार खासदारांचा सत्कार तर केलाच आहे, पण त्यासोबतच आपले हक्काचे वीस आमदार आणि अनेक नगरसेवक अजूनही खंबीरपणे सोबत उभे आहेत. "ज्या वेळेपासून आपण आपले यश-अपयश हे केवळ निवडणुकीच्या निकालासोबत तुलना करायला लागतो, तिथेच आपण फसतो, असं माझं स्पष्ट मत आहे," असे सांगत त्यांनी केवळ निवडणुका जिंकणे म्हणजेच यश नव्हे, तर पक्षाची विचारधारा टिकवणे महत्त्वाचे असल्याचे ठाकरे म्हणाले.
शिवसेनाप्रमुखांसोबतची पहिली नेत्यांची फळी ज्या वेळी होती, ज्यांनी पक्षासाठी अतोनात कष्ट घेतले, ते निष्ठावंत आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळत आहेत, असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.