संजय गडदे, साम टीव्ही
अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबार प्रकरणात आरोपींना अटक करण्यासाठी राजस्थान पोलिसांनी केलेल्या कारवाईची थरारक माहिती समोर आली आहे. पोलिसांची नजर चुकवण्यासाठी आरोपींनी ट्रेनमध्येच केस कापले, कपडे बदलले आणि मुंबईहून दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरू केला. मात्र, कोटा रेल्वे स्थानकात भुजिया खरेदी करण्यासाठी खाली उतरलेला एक आरोपी आरपीएफच्या सतर्क जवानांच्या नजरेत आला. त्यानंतर झालेल्या चौकशीत त्याचे दोन साथीदारही त्याच डब्यात असल्याचे समोर आले.
मिळालेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील तीन संशयित आरोपी मुंबईहून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवास करत होते. तिघेही एकाच डब्यात वेगवेगळ्या सीटवर बसले होते. कोटा स्थानक येईपर्यंत त्यांच्यापैकी दोन जण वरच्या बर्थवर झोपले होते. कोटा रेल्वे स्थानकात ट्रेन थांबल्यानंतर त्यांच्यापैकी एक आरोपी भुजिया खरेदी करण्यासाठी खाली उतरला. याचवेळी साध्या वेशातील रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानाने त्याला ओळखल्याची माहिती समोर आली आहे.
जवानांनी तातडीने संबंधित डब्यात प्रवेश केला आणि आरोपीची चौकशी सुरू केली. मुंबईहून तुम्ही तिघे एकत्र ट्रेनमध्ये बसला होता का, अशी विचारणा करण्यात आली. त्यावर अन्य दोघे झोपले असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर जवानांनी त्या दोघांनाही उठवून तिघांना ताब्यात घेतले.
तपासाशी संबंधित माहितीनुसार, आरोपींनी आपली ओळख लपवण्यासाठी केस कापले होते आणि कपडेही बदलले होते. त्यातील रिहानचे केस लांब असल्याने तो ओळखला जाण्याची शक्यता होती. त्यामुळे हल्ल्यानंतर ट्रेनमध्येच त्याने केस कापल्याचा दावा करण्यात येत आहे. तिघांनी वेगवेगळ्या डब्यांमध्ये प्रवास करण्याऐवजी एकाच डब्यात वेगवेगळ्या सीटवर बसण्याचा मार्ग निवडला होता. मात्र, कोटा स्थानकावरील आरपीएफच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरला.
या प्रकरणात अनिल पंडित हा कथित सूत्रधार असल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात येत आहे. त्याने रिहानशी संपर्क साधून टायगर श्रॉफच्या हत्येसाठी सुपारी दिल्याचा आरोप आहे. हल्ल्यासाठी शस्त्रे उपलब्ध करून देणे, आर्थिक मदत करणे आणि आरोपींना परदेशात पाठवण्याचे आश्वासन देणे, असे आरोपही समोर आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, अनिल पंडित अमेरिकेतील कॅलिफोर्नियातून ऑनलाइन संपर्क साधून आरोपींना सूचना देत होता. त्याने कथितपणे अडीच लाख रुपये आगाऊ दिले होते. आरोपींच्या खर्चासाठी दररोज पाच ते दहा हजार रुपये पाठवले जात असल्याचाही दावा आहे.
आरोपी ऑनलाइन व्यवहारांच्या माध्यमातून दुकानदारांना पैसे पाठवत आणि त्यांच्याकडून रोख रक्कम घेत असल्याची माहितीही समोर आली आहे. आरोपींशी संपर्क साधण्यासाठी जंगी अॅपचा वापर केला जात असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. या आर्थिक व्यवहारांची आणि संपर्क यंत्रणेची तपासातून पडताळणी होणे महत्त्वाचे आहे.
टायगरच्या लोकेशनची रेकी केल्याचा दावा
या प्रकरणात ऋतिक नावाच्या आरोपीवर टायगर श्रॉफच्या लोकेशनची रेकी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. आरोपी मुंबईतील एका हॉटेलमध्ये सुमारे महिनाभर राहत असल्याचाही दावा आहे.
हल्ल्यानंतर आरोपींना दिल्लीमार्गे नेपाळला पाठवण्याची योजना होती, अशी माहितीही समोर आली आहे. मात्र, या संपूर्ण कटामागील नेमकी भूमिका, आर्थिक व्यवहार, शस्त्रांचा पुरवठा आणि इतर व्यक्तींचा सहभाग याबाबत तपासातून अधिकृत निष्कर्ष समोर येणे बाकी आहे.
तपासात आणखी कोणती माहिती समोर येणार?
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाचा तपास गंभीरतेने सुरू असून, आरोपींच्या अटकेनंतर या हल्ल्यामागील कथित सूत्रधार, आर्थिक मदत, रेकी आणि पळून जाण्याची योजना याबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.