पंढरपूर : अक्षय तृतीया आज सर्वत्र साजरी होत आहे. आंब्याचे सिझन सुरु झाल्यानंतर आजच्या दिवसापासूनच आमरस पुरी खाण्यास सुरवात करण्यात येत असते. त्यानुसार आजपासून विठुरायाच्या महानैवेद्यात देशील आमरसाला सुरुवात झाली आहे. आज भाविकांनाही अन्नक्षेत्रात आमरस पोळीचा महाप्रसाद देण्यात आला.
अक्षय तृतीयेनिमित्त आज विठुरायाच्या महाप्रसादाच्या पंचपक्वान्नाच्या महानैवेद्य मध्ये आंब्याच्या रसाची भर पडली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याचा प्रसाद महत्त्वाचा मानला जातो. आजपासून विठुरायालाही महाप्रसादात आमरस देण्यात सुरुवात झाली आहे. विठुरायाच्या परिपूर्ण महाप्रसादामध्ये लिंबू, चटणी, कोशिंबीर, पातळ भाजी, सुकी भाजी, वरण- भात, पुऱ्या, भजी तर पकवान्नामध्ये पुरणपोळी, साखर भात, श्रीखंड, बेसनाचे लाडू, शेवयाची खीर आणि आमरस याचा समावेश असतो.
वटपौर्णिमेपर्यंत असणार आमरस
आजपासून शेवयाच्या खिरीची जागा आमरसाने घेतली आहे. वटपौर्णिमेपर्यंत देवाच्या महाप्रसादात आमरस राहणार आहे. रुक्मिणी मातेच्या महाप्रसादात कटाची आमटी आणि कडबू हे वेगळे पदार्थ असतात. तर विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने अन्नछत्रातील सर्व भाविकांना आज आमरस पोळीचा महाप्रसाद देण्यात आला.
गणपतीपुळे मंदिरात हापूस आंब्याची आरास
रत्नागिरी : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याची खरेदी करत असतात. मात्र रत्नागिरीतला गणपतीपुळे मंदिरात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्रींच्या चरणी हापूस आंब्याची आरास करण्यात आली. जवळपास ८०० हून अधिक आंबे हे श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आले. गणपतीपुळे मंदिराचे मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर यांनी ही आरास केली. नंतर हे आंबे भाविकांमध्ये प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहेत.
मानाचा कसबा गणपतीला २११ डझन हापूस आंब्याची आरास
सोलापूर : अक्षय तृतीया निमित्त सोलापुरातील श्रीमंत मानाच्या कसबा गणपतीला २११ डझन हापूस आंब्याची आरास करण्यात आली आहे. सोलापूरच्या बाळीवेस, कसबातील शेतकऱ्याचा राजा म्हणून ओळखला जाणारा कसबा गणपतीला देवगड हापूस आंब्याची आरास करण्यात आली. हे आंबे भक्तांनी देवाच्या चरणी प्रसाद म्हणून आणून दिले आहेत. त्याचीच आरास करण्यात आली आहे. गणपती मूर्ती भोवती आंबे रचून सजावट करून त्यासमोर बैलगाडीतून शेतकरी परिवार आंबे वाहतूक करतोय; असा देखावा साकारण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.