सचिन कदम, रायगड प्रतिनिधी
Pramod Mhaskar joins Eknath Shinde Shiv Sena : सुनील तटकरे यांचे होमपिच असलेल्या रोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय झटका बसला आहे. पेण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आणि तटकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रमोद म्हसकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. रोहा शहरातील बाजारपेठेत झालेल्या या जाहीर प्रवेश सोहळ्यात प्रवेशकर्त्यांनी तटकरे कुटुंबाच्या कार्यपद्धतीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तटकरे कुटुंबातील अंतर्गत कलश चव्हाट्यावर
एका बाजूला रायगडमध्ये महायुतीत फूट पडत असतानाच, रोहा पंचायत समितीचे सदस्य सुरेश मगर यांनी थेट तटकरे कुटुंबातील अंतर्गत वादावर बोट ठेवले आहे. मंत्री आदिती तटकरे यांना विधानसभेचे तिकीट मिळू नये म्हणून अनिकेत तटकरे यांनी मोर्चेबांधणी केल्याचा खळबळजनक आरोप सुरेश मगर यांनी केला. "जे स्वतःच्या बहिणीचे होऊ शकले नाहीत, ते तुमचे-आमचे कार्यकर्त्यांचे काय होणार," असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केला.
'शिवसेनेचा शेकाप होऊ नका' - विकास गोगावले यांचा सल्ला
या संपूर्ण राजकीय घडामोडीदरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील वाढत्या संघर्षावर मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र तथा जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी परखड भाष्य केले आहे. राष्ट्रवादीच्या कुरघोडीच्या राजकारणावर ताशेरे ओढताना विकास गोगावले यांनी शिवसेना नेते व पदाधिकाऱ्यांना ऐतिहासिक दाखला दिला.
रायगड जिल्ह्यात एकेकाळी दबदबा असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाची (शेकाप) आज झालेली अवस्था त्यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिली. "जिल्ह्यात एकेकाळी सत्तेत असणारा शेतकरी कामगार पक्ष आज संपला आहे. शिवसेनेची तीच गत होऊ नये, म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांशी असणारी मैत्री थोडी लांब ठेवा," असा मोलाचा आणि थेट सल्ला विकास गोगावले यांनी व्यासपीठावरून नेत्यांना दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.