नागपुरात आई आणि विवाहित मुलीची दुहेरी आत्महत्या
बाळाच्या मृत्यूनंतर मुलगी मानसिकदृष्ट्या खचली होती
संपत्तीच्या वादामुळे कौटुंबिक तणाव वाढल्याची माहिती
पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू
पराग ढोबळे, नागपूर
नागपूर शहरात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेने आणि तिच्या विवाहित मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राथमिक तपासात या दोघीनी नैराश्येतून हे पाऊल उचलले असल्याचं समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संगीता ढबाले (आई) आणि आकांक्षा ब्रम्हे (मुलगी) असे मृतांचे नाव आहे. आकांक्षा ब्रम्हे हिचे सुमारे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. काही महिन्यांपूर्वी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. मात्र, त्या नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर आकांक्षा मानसिकदृष्ट्या खूप खचली होती. या घटनेनंतर आकांक्षा आईकडे राहण्यासाठी आली होती.
प्राथमिक माहितीनुसार आकांक्षाचा पती लोकेश ब्रम्हे हा संपत्तीच्या कारणावरून वारंवार वाद घालत असल्याचे समोर आले आहे. या कौटुंबिक वादामुळे आणि सततच्या मानसिक तणावामुळे आकांक्षा ब्रम्हे त्रस्त होती. अशी माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून दोघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. मृत्यूमागील नेमके कारण काय आहे? याचा शोध घेण्यासाठी पोलिस विविध अँगलने चौकशी करत आहेत. या घटनेने दोन्ही कुटुंबात दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.