बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने येथीलच एका विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. मेहकर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील पिण्याच्या पाण्याचे संयंत्र अनेक महिन्यांपासून नादुरुस्त असल्याने विद्यार्थ्यांनी याबाबात प्राचार्यांकडे अनेकदा तक्रारी करूनही काही फायदा झाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्याकडील पैसे जमवून शुद्ध पिण्याचे पाणी विकत आणायची वेळ आली आहे.
हे देखील पाहा :
आज संस्थेतील विध्यार्थी शैलेश राठोड व नवनाथ जुमडे हे दोघे पिण्याचे पाणी आणण्यासाठी संस्थेबाहेर गेले असता भरधाव ट्रकने त्या दोघांनाही उडविले. या अपघातात शैलेश राठोड जागीच ठार झाला. तर, नवनाथ गंभीर जखमी झाला असून त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असती तर आज शैलेश याचा अपघात झाला नसता. त्यामुळे संस्थेचे प्राचार्य शैलेशच्या मृत्यूस जबाबदार असल्याची भावना शैलेशच्या भावाने व्यक्त केली.
मेहकर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विध्यार्थ्यांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे पण. गेल्या कित्येक महिन्यापासून ती नादुरुस्त असल्याने विद्यार्थ्यांनी अनेकदा प्राचार्यांकडे तक्रारी केल्यात. पण, प्राचार्यांनी तुमची पाण्याची व्यवस्था तुम्हीच करा असा सल्ला दिल्याचे हे विद्यार्थी सांगत आहेत. आज भर उन्हाळ्यात एका विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला. यासंदर्भात प्राचार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.