मनोज जरांगे पाटील यांनी आणखी एक ऑडिओ क्लिप समोर आणण्याचे संकेत दिले
नव्या ऑडिओ क्लिपमुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना राजकीय धक्का बसू शकतो, असा त्यांचा दावा.
५०० कोटींच्या आधीच्या ऑडिओ क्लिप प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी
काही महिन्यांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महिनाभरापूर्वी ५०० कोटींचा ऑडिओ बॉम्ब फोडला होता. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारे विधान केले आहे. लवकरच आणखी एक ऑडिओ क्लिप समोर आणण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. या क्लिपमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का बसू शकतो, असा दावा जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
जरांगे पाटील म्हणाले की, याआधी समोर आणलेल्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची अद्याप योग्य प्रकारे चौकशी झालेली नाही. या प्रकरणात मला कोणत्याही चौकशीसाठी बोलावण्यात आलेले नाही. त्यामुळे आधीच्या क्लिपचा शोध घेऊन त्यामागचे सत्य समोर आणावे. तसेच या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी पुन्हा केली. भाजपने एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप का केले आणि त्यामागे नेमका काय उद्देश होता, हे स्पष्ट करावे, अशी मागणीही जरांगे यांनी केली. संबंधित प्रकरणातील सर्व बाबी मान्य करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चेवरही जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. या चर्चा भाजपवर दबाव निर्माण करण्यासाठी सुरू असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. तसेच सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधत पक्षात काही जणांकडून अंतर्गत राजकारण केले जात असल्याचे ते म्हणाले.
एकनाथ शिंदेंच्या पक्षातही अशाच प्रकारच्या घडामोडी सुरू असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. ५०० कोटींच्या आरोपानंतर राजकीय समीकरणे बदलत असल्याचेही त्यांनी सूचित केले. दरम्यान, जरांगे पाटील यांनी धाराशिव जिल्हा दौऱ्यात येडशी येथे जाऊन जळीत घटनेत मृत्यू झालेल्या करंडे कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राजकीय घडामोडींवर आपली भूमिका मांडली. आता जरांगे पाटील यांनी सांगितलेली नवीन ऑडिओ क्लिप नेमकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे आणि त्यातून कोणती माहिती समोर येणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.