मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाने राज्यभरात सपाटाच लावला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतातील कामेदेखील ठप्प झाली आहेत. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यभरात अशीच परिस्थिती कायम राहिल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना अलर्टही दिला आहे. (Weather Update Maharashtra)
पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. विदर्भासोबत कोकण, घाटमाथ्यावरही पावसाने थैमान घातले आहे आहे. घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी 200 मिलिमीटपेक्षा जास्त पाऊस पडल्याने नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भातही मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली.
मराठवाड्यात मुसळधार पावसाची हजेरी
गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. हिंगोली, परभणी जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस झाला. हिंगोली, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील अनेक मंडळांत पावसाचा जोर होता. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यात पावसाचे सत्र सुरूच आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. (Rain News In Maharashtra Today)
'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
दरम्यान राज्यात पुढील दोन ते तीन दिवसांत पावसाचा जोर वाढणार असून पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर या भागात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
दुसरीकडे मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, कोल्हापूर, अकोला, अमरावती, गोंदिया या भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर बुलडाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच विदर्भातही पावसाचा जोर कायम राहिल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.