Maharashtra government closes seven women welfare schemes Saam TV (AI)
महाराष्ट्र

मोठी बातमी! महिलांच्या ७ योजनांना कात्री; ४ गुंडाळल्या, ३ बंद होणार; लाडकी बहीण योजनेचं काय झालं?

Mazi Kanya Bhagyashree Yojan Close: महाराष्ट्र सरकारने महिला व बालविकास विभागाच्या सात कल्याणकारी योजनांबाबत बंद किंवा टप्प्याटप्प्याने गुंडाळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लाडकी बहीण योजना सुरू आहे का? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Namdeo Kumbhar

Maharashtra government closes seven women welfare schemes : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची राज्यभरात सध्या तुफान चर्चा सुरू आहे. महिलांना आर्थिक साह्य मिळावे म्हणून लाडकी बहीण योजनेद्वारे प्रत्येक महिन्याला १५०० रूपयांचा सन्मान निधी दिला जातो. पण दुसरीकडे महिला व बालविकास विभागाच्या महत्त्वाच्या ७ कल्याणकारी योजनांना कात्री लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. खर्चाचा अभाव, निधीची कमी मागणी आणि नागरिकांकडून अपुरा प्रतिसाद मिळाल्यामुळे योजनांना कात्री लावण्यात आली आहे. यातील ४ योजना तात्काळ बंद केल्या असून उरलेल्या ३ योजना टप्प्याटप्प्याने गुंडाळल्या जाणार आहेत.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे 'माझी कन्या भाग्यश्री' आणि महिला मंडळांना दिल्या जाणाऱ्या अनुदानासारख्या महत्त्वाच्या योजनांना फटका बसला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शासनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. 'लाडकी बहीण' योजना अद्याप सुरू आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी लवकरच लाडक्या बहि‍णींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण दुसरीकडे मात्र महिला बाल विकास विभागाच्या ७ योजना बंद करण्यात आल्या आहेत.

कोणत्या योजनांना लागली कात्री ?

  • माझी कन्या भाग्यश्री योजना

  • महिलांसाठी बहुउद्देशीय सामाजिक केंद्रे

  • महिला मंडळांना अनुदान

  • देवदासींच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी साह्य

  • वीज नसलेल्या अंगणवाड्यांसाठी सौरऊर्जा संच (Solar Power Units)

  • निवारागृह चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना साह्य

  • करोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी आर्थिक मदत

महिला व बालविकास विभागाकडून काही महत्त्वाच्या योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर काहींचे अर्थसंकल्पीय लेखाशीर्ष रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महिलांसाठी बहुउद्देशीय सामाजिक केंद्रे ही योजना खर्च घटत असल्याच्या कारणास्तव १६ ऑक्टोबरपासून बंद करण्यात आली आहे. तसेच, जिल्हा परिषदांमार्फत महिला मंडळांना अनुदान देण्याची योजना आणि देवदासींच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी साह्य करणारी योजना, या दोन्ही योजनांना कडून निधीची कोणतीही मागणी किंवा पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय, वीज नसलेल्या अंगणवाडी केंद्रांसाठी सौरऊर्जा संच पुरवण्याची योजना देखील बंद केली आहे. ज्या अंगणवाड्यांमध्ये वीजजोडणी उपलब्ध आहे, तिथे वीजखर्चासाठी केंद्र सरकारकडून दरमहा ५०० रुपयांची तरतूद असल्याचे कारण यासाठी देण्यात आले आहे. मात्र, कागदोपत्री अनुदानाची तरतूद असणे आणि प्रत्यक्षात प्रत्येक अंगणवाडीत वीज उपलब्ध असणे या दोन भिन्न गोष्टी असल्यामुळे, वीजजोडणी नसलेल्या अंगणवाड्यांसमोर निर्माण होणाऱ्या परिस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.

दुसरीकडे, 'माझी कन्या भाग्यश्री' या योजनेच्या बाबतीत सुधारित स्वरूपात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ही जुनी योजना आधीच बंद करून १ एप्रिल २०२३ पासून तिच्या बदलात 'लेक लाडकी' योजना अमलात आणण्यात आली आहे. आता या जुन्या योजनेचे स्वतंत्र अर्थसंकल्पीय लेखाशीर्ष पूर्णपणे बंद करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. असे असले तरी, ३१ मार्च २०२३ पर्यंत ज्या लाभार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले होते, त्यांची सर्व प्रलंबित देयके मार्च २०२७ अखेरपर्यंत अदा करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर आर्थिक वर्ष २०२७-२८ पासून या जुन्या योजनेचे लेखाशीर्ष कायमचे रद्द केले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापूर गोकुळ दूध संघ निवडणूक: महायुतीची १७ जागांवर घसघशीत आघाडी

Former MLA Rahul Bondre : काँग्रेसच्या माजी आमदाराला पोलिसांनी बजावली नोटीस, १५ दिवसांत मागितलं उत्तर; नेमकं प्रकरण काय?

झाडूविषयीचे 7 महत्त्वाचे वास्तू नियम! धनसंपत्ती आणि सुख-समृद्धीसाठी फायदेशीर

Public Washroom Safety : महिलांनो सावधान! पब्लिक वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा तर नाही ना? आत शिरताच 'या' ५ जागा तपासा

डिलिव्हरी बॉईज अन् कॅब चालकांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शनचा नवा मार्ग मोकळा, जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT