मुंबईकर आणि कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई ते चिपी (सिंधुदुर्ग) मार्गावर पुन्हा एकदा विमानाचे उड्डाण सुरू होणार आहे. १६ नोव्हेंबर २०२६ पासून नवी मुंबई ते चिपी विमानतळ अशी थेट विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. या नव्या विमानसेवेमुळे सिंधुदुर्ग आणि मुंबई महानगर प्रदेशादरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होणार आहे.
गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून ही विमानसेवा बंद झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा नवी मुंबई वरून चिपी ही विमानसेवा सुरू होत असल्यामुळे मुंबईकर कोकणवासीयांना एक ते सव्वातासामध्ये थेट कोकणात आपल्या गावी जाता येणार आहे. या विमान सेवेमुळे सिंधुदुर्गच्या पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच हॉटेल व्यवसाय, वाहतूक, होम स्टे आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
चिपी विमानतळाच्या माध्यमातून सिंधुदुर्गच्या विकासाला नवी दिशा मिळण्याचा आशावाद पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. फ्लाय ९१ कंपनीच्या माध्यमातून आठवड्याचे सातही दिवस ही विमानसेवा उपलब्ध होणार असल्याची घोषणाही पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे. या विमानसेवेमुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन आणि आर्थिक विकासाला नवी चालना मिळणार आहे.
नितेश राणे यांच्या मते, फ्लाय ९१ एअरलाइनची नियमित विमानसेवा सिंधुदुर्गासाठी एक महत्त्वपूर्ण घडामोड आहे. पर्यटक आता नवी मुंबईहून थेट विमानाने जिल्ह्यात पोहोचू शकतील. यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि सिंधुदुर्गाकडे अधिक पर्यटक आकर्षित होतील. या उपक्रमामुळे हॉटेल्स, वाहतूक, टूर गाईड्स आणि स्थानिक व्यवसायांना फायदा होण्याची अपेक्षा आहे, तसेच स्थानिक तरुणांसाठी नवीन रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतील.
तांत्रिक आणि इतर समस्यांमुळे चिपी विमानतळावरील हवाई सेवा यापूर्वी स्थगित करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांपासून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने विमानतळाच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. विमानतळाकडे जाणारे रस्ते, वीजपुरवठा आणि रात्रीच्या वेळी विमान उतरण्याच्या सुविधांशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. दीर्घकालीन हवाई सेवा सुनिश्चित करण्यासाठी 'व्हायबिलिटी गॅप फंडिंग' देण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.