मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. या निवडणुकीत महायुतीने थेट २३० चा आकडा गाठला. या निकालानंतर आता महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. यामुळे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी देखील आमदारांची रेलचेल वाढली आहे.
विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. त्यामुळे महायुतीने बैठकांचा सपाटा लावला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रिपदाचा पॅटर्न कायम राहणार आहे. महायुती सरकारच्या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडे ही प्रमुख पद कायम राहणार आहे. भाजप महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा भाजपचाच असणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेस यांना सत्तेत योग्य सन्मान दिला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
तसेच या नव्या सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मागच्या मंत्रिमंडळातील अनेक चेहऱ्यांना वगळण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेतील माजी मंत्र्यांपैकी काही मंत्र्यांचा पत्ता कट होणार आहे. त्याचबरोबर वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिवसेनेकडून मंत्रिपदासाठी संजय शिरसाट, भरत गोगावले, विजय बापू शिवतारे, विठ्ठलराव लंघे, अपक्ष शरद सोनवणे, या नावांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे कोल्हापूरमधील सर्व आमदार सागर बंगल्यावर देवेद्र फडणवीस भेटीसाठी दाखल झाले आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ गेल्या २ तासांपासून सागर निवासस्थानी आहेत. संजय काकडे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत. तर पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी देखील फडणवीस यांची भेट घेतली.
पर्वती मतदारसंघाच्या विजयी उमेदवार आणि विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. माधुरी मिसाळ यांनी मुंबईत फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली .येत्या मंत्रिमंडळ विस्तारात माधुरी मिसाळ यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. माधुरी मिसाळ यांना महायुती सरकारकडून राज्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आई आशाताई पवार देवगिरीवर पोहोचल्या. बारामतीमध्ये अजित पवारांच्या विजयाचा जल्लोष केल्यानंतर आज आई-लेकाची भेट झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी फडणवीस वर्षांवर पोहोचणार आहे. सत्ता स्थापनेच्या संदर्भात तसेच दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्रिपदावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. 'मुख्यमंत्री कोण हे दिल्लीतील नेते ठरवतील. मी ताज लँड हॉटेलला एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी आलोय', असे राणे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.