बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यांचे रुपांतर आज चक्रीवादळात आणि १७ नोव्हेंबर रोजी तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा देशाला धोका आहे. यामुळे देशातील ९ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या राज्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी अंदमान आणि निकोबार बेट, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुचेरी आणि केरळसह ९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पावसाची शक्यता आहे. जसजसे वादळ बंगालच्या उपसागरात पुढे सरकेल तसतसा वाऱ्याचा वेगही झपाट्याने वाढेल.
आग्नेय बंगालच्या उपसागरात वाऱ्याचा वेग ताशी ५५ ते ६५ किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून वाऱ्याचे झोत ताशी ७५ किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतात. थंडी वाढण्याऐवजी देशाच्या मैदानी प्रदेशात सध्या तापमानात चढ-उतार होत आहे. उत्तर भारतात सकाळी धुक्यात वाढ होत आहे. महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही पण राज्यात थंडी वाढली आहे. राज्यात थंडीचा जोर वाढला असून सकाळी आणि रात्री थंडी जास्त असते.
हवामान खात्याने सांगितले की, राज्यात सध्या संमिश्र हवामानाचा अनुभव येत असून दिवसा उष्णता, तर रात्री आणि पहाटे थंडी जाणवत आहे. पुढील २ ते ३ दिवस थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर विशेष परिणाम होण्याची शक्यता नाही. राज्यात बहुतांश ठिकाणी कोरडे हवामान कायम राहणार असून पावसाचा कोणताही अलर्ट नाही.
राज्यात कमाल तापमान ३३ अंशांपर्यंत आहे. किमान तापमानात घट होत असल्याने राज्यात थंडीचा जोर वाढणार आहे. कोकणात कमाल तापमान ३३, तर किमान १९ अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात रात्रीचे तापमान १५ अंशांच्या आसपास असेल. पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमान १२ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात कमाल तापमान ३४, तर किमान २० अंशांपर्यंत राहणार आहे. विदर्भात कोरडे आणि निरभ्र हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. पुढील दोन ते तीन दिवस थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.