औरंगाबाद - सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेल्या घोषणेनुसार दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण करता यावे यासाठी सरकारतर्फे बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येत आहे. हे लक्षात घेता युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन तर्फे देशभरातून सर्व राज्यांच्या राजधानीत धरणे कार्यक्रम संघटित करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यासाठी मुंबई महानगरात हा धरणे कार्यक्रम दिनांक 4 डिसेंबर शनिवार रोजी आझाद मैदान येथे सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या धरणे कार्यक्रमात एआयबीइए एनसीबीइ, बेफी, एआयबीओए, आयबोक, इनबोक, इंनबेफ या संघटनांचे राज्यभरातील दोनशेवर बँक कर्मचारी तसेच अधिकारी प्रातिनिधिक स्वरूपात सहभागी होत आहेत.
हे देखील पहा -
बँक खाजगीकरणा सारख्या अर्थव्यवस्थेशी निगडीत अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर सरकार समाजातल्या विविध घटकांशी चर्चा न करता हा निर्णय लादू पाहत आहे. त्या विरोधात ही धरणे आयोजित करण्यात आली आहेत. सध्या एका नंतर एक खाजगी क्षेत्रातील अनेक बँका तोट्यात जात आहेत. ज्यामुळे सामान्य जनतेच्या मनात त्यांच्या ठेवी बाबत एक असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे अशा वेळी फायद्यात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण सरकार करू पाहत आहे हे सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि त्यांच्या ठेवीदार साठी आत्मघातकी सिद्ध होऊ शकते.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी वर्ष 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीत कार्यगत नफा कमविला आहे. 50,863 कोटी रुपये तर निव्वळ नफा 17,132 कोटी रुपये. असे असताना या बँकांचे खाजगीकरण करून या बँका खाजगी क्षेत्राला बहाल केल्या तर त्यातून पुन्हा ग्लोबल ट्रस्ट बँक, येस बँक, बँक ऑफ कराड सारख्या बँका तयार होणार नाहीत याची खात्री कोण देईल? यामुळे बँकिंग तसेच अर्थव्यवस्थेत अस्थैर्य निर्माण होईल हे लक्षात घेता कोट्यावधी लोकांच्या जनजीवनाशि संबंधित असलेल्या बँकिंग विषयक धोरणात्मक निर्णय सरकारने जनतेवर लादू नये अन्यथा बँक कर्मचारी पुढाकार घेऊन बँक ग्राहकांना सहभागी करून घेऊन एक जनआंदोलन उभे करतील असे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन तर्फे स्पष्ट करण्यात येत आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने सार्वजनिक क्षेत्रातील संभाव्य खाजगीकरणाच्या विरोधात यापूर्वीच दिनांक 17 तसेच दिनांक 18 डिसेंबर दोन दिवसाच्या देशव्यापी संपाची हाक दिलेली आहे . या शिवाय या काळात युनायटेड फोरम तर्फे मधल्या काळात सभा, मोर्चे, निदर्शने, धरणे, मानवी साखळी, गावा गावातून जत्थे इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.