संजय राठोड
यवतमाळ : सहा वर्षाच्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार करणार्या आरोपीला तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. यवतमाळ जिल्हा सत्र न्यायालयाने हा महत्वपूर्ण निकाल दिला. आरोपीला ही शिक्षा एकाच वेळी भोगायची आहे. याशिवाय 15 हजार रूपयांच्या दंडाची रक्कम पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश ह. ल. मनवर यांनी गुरूवारी दिला. संजय उर्फ मुक्या जाधव (वय 24, रा. बोरगाव, ता. आर्णी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
माहितीनुसार, 13 मार्च 2022 रोजी 6 वर्षाच्या चिमुकलीला घरात बोलावून चॉकलेटचे आमिष दाखविले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. नराधमाची मजल इथपर्यंत गेली की, त्यानंतर त्याने पीडितेला 5 रुपये देऊन कुणाला सांगू नको अशी समज दिली. दरम्यान, पीडितेची आई घरी आल्यावर मुलीच्या कपड्यावर रक्त दिसले. मुलगी रडत असल्याने आईने मुलीला विचारणा केली असता, घडलेला घटनाक्रम सांगितला. मुलीच्या आईने आर्णी पोलिस ठाणे गाठून तोंडी तक्रार दिली. पीडित व आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. उपलब्ध झालेले आर्टीकल्स परिक्षणासाठी पाठविले. तसेच पीडित, फिर्यादी व इतर साक्षिदारांचे जबाब नोंदवले.
दरम्यान, रिपोर्टप्रमाणे पीडिताचे रक्त आरोपीच्या कपड्यावर आढळून आले. साक्षीपुरावे, वैद्यकीय अहवाल, डीएनए रिपोर्ट अशा पुराव्यावरून आरोपीने अत्याचार केल्याचे सिद्ध झाले. हा खटला दारव्हा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ह. ल. मनवर यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडित, फिर्यादी, वैद्यकीय तपासणी करणार्या डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिलखेलकर, उपविभागीय अधिकारी अनिल आडे, आर्णी ठाणेदार पितांबर जाधव यांनी केला. जलदगतीने खटला चालवून अवघ्या दोन महिन्याच्या आत खटला निकाली काढण्यात आला. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील नीती दवे यांनी बाजू मांडली.
अशी आहे शिक्षा व दंड
कलम सहा बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा 2012 अंतर्गत आजीवन कारावासाची शिक्षा व पाच हजार रूपये दंड, कलम 376 (अ) (ब) भादंवीअंतर्गत आजीवन कारावासाची शिक्षा व पाच हजार रूपये दंड, कलम 3 (2) (व्ही) अॅट्रॉसिटी अंतर्गत आजीवन कारावास व पाच हजार रूपये दंड, अशी शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडितेला देण्याचा आदेश असून, सर्व शिक्षा आरोपी संजय उर्फ मुक्या जाधव याला एकाच वेळी भोगायच्या आहेत.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.