राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत रेशनकार्ड धारकांना धान्यात बदल करुन मिळणार आहे. आत्तापर्यंत धान्यात तांदळाचा समावेश होता पण मार्चमध्ये यात बदल होणार आहे. यामध्ये तांदळाऐवजी लाभार्थ्यांना गव्हासोबत मका देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पुढील तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवला जाणार आहे.
शिधा वितरणात महत्त्वाचा बदल
मार्चपासून तांदळाऐवजी मक्याचे वितरण करण्यात येणार आहे. राज्य शासनाने साठा व्यवस्थापन आणि पर्यायी धान्याचा वापर वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत या निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे.
किती लाभार्थ्यांना होणार फायदा?
अंत्योदय योजनेतील ८७,०६४ रेशनकार्डधारक (३,८६,०३४ लाभार्थी) या बदलाच्या कक्षेत येतात. प्राधान्य कुटुंब योजनेतील ६,३७,११४ रेशनकार्डधारक (२५,६३,९७१ लाभार्थी) यांनाही याचा लाभ मिळणार आहे. एकूण जिल्ह्यातील लाखो कुटुंबांच्या शिध्यात तात्पुरता बदल होणार आहे.
कोणाला किती धान्य मिळणार?
अंत्योदय योजनेतील कुटुंबांना दरमहा १० किलो मका आणि ११ किलो गहू दिला जाणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेतील प्रत्येक लाभार्थ्याला २ किलो गहू आणि १ किलो मका मिळेल. हा बदल सुरुवातीला तीन महिन्यांसाठीच लागू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
खरेदी प्रक्रिया आणि वितरण व्यवस्था
जिल्ह्यातील आठ केंद्रांवर मका खरेदी सुरू आहे. ते म्हणजे बनगर, घारगाव, श्रीगोंदा, घोगरगाव, मिरजगाव, शेवगाव, पाथर्डी आणि कोपरगाव इ. आतापर्यंत सुमारे १५ हजार क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत खरेदी प्रक्रिया सुरू राहील, त्यानंतर रेशन दुकानांमार्फत वितरण केले जाईल.
काही केंद्रांवर नोंदणीचा अभाव
जामखेड आणि संगमनेर ईथे असणाऱ्या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी नोंदणी न केल्याने ही माहिती समोर आली आहे. यामुळे त्या भागातील खरेदी प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना नोंदणीसाठी आवाहन करण्यात येत आहे. मक्याचे काय करायचे? असा प्रश्न अनेक लाभार्थ्यांकडून विचारला जात आहे. ग्रामीण भागात मका दळून भाकरी किंवा इतर पदार्थ बनवले जातात, मात्र शहरी भागात वापराबाबत संभ्रम आहे. यासाठी प्रशासनाकडून जनजागृती आणि मार्गदर्शनाची गरज व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.