Tiger Shroff Firing Case: अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी सुमित, कुणाल, राधा आणि बबिता या चारही जणांना न्यायालयाने २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई क्राइम ब्रँचकडून सुरू असून, गोळीबारामागील पूर्वनियोजित कट, शस्त्रांचा पुरवठा आणि आरोपींमधील संपर्क यांचा तपास केला जात आहे. न्यायालयात यावेळी सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाकडून वेगवेगळे युक्तिवाद करण्यात आले.
क्राइम ब्रँचने न्यायालयात आरोपी हे पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे तपासात समोर आल्याचा दावा केला. आरोपी क्रमांक १, २ आणि ३ यांना अटक करण्यात आली असून, ते ज्या हॉटेलमध्ये राहत होते, त्या ठिकाणचा पंचनामा करण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणेने दिली. या प्रकरणात शस्त्रे कुठे नष्ट करण्यात आली किंवा त्यांची विल्हेवाट कुठे लावण्यात आली, याबाबत तपासातून माहिती मिळाल्याचेही पोलिसांनी सांगितले. आरोपी राधाने गोळीबार करणाऱ्या आरोपीला शस्त्रे पुरवल्याचा आरोप क्राइम ब्रँचकडून करण्यात आला आहे.
तसेच आरोपींनी अनेक फोटो, व्हिडिओ आणि इतर डिजिटल डेटा डिलीट केल्याचे तपासात आढळल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयाला सांगितले. आरोपींकडून काही व्हॉइस नोट्स हस्तगत करण्यात आल्या असून, त्यावरून आरोपींना कटाची माहिती असल्याचे स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाला सांगितले. या डिजिटल पुराव्यांचा आणि आरोपींमधील संपर्काचा तपास सुरू आहे. असा युक्तीवाद करण्यात आला.
दुसरीकडे, आरोपींच्या वकिलांनी आणखी पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद केला. आरोपींचे मोबाईल फोन, सिम कार्ड आणि वाहने पोलिसांनी आधीच जप्त केली आहेत. तसेच सीसीटीव्ही फुटेज, दोन पिस्तुले, काही जिवंत काडतुसे, सिग्नल ॲपमधील डेटा, व्हॉइस सॅम्पल्स आणि इतर महत्त्वाचे पुरावे हस्तगत करण्यात आल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाला सांगितले. ट्रान्झिट रिमांडसह गेल्या सात दिवसांत तपास यंत्रणेने महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. त्यामुळे आरोपींना आणखी पोलीस कोठडीत ठेवून नवीन पुरावे मिळण्याची शक्यता कमी असल्याचे बचाव पक्षाचे म्हणणे होते. याशिवाय, आरोपींपैकी नेमका कोणाचा अनिल पंडित यांच्याशी थेट संबंध होता, हे तपास यंत्रणेला अद्याप सिद्ध करता आलेले नसल्याचा दावा बचाव पक्षाने केला.
आतापर्यंत गोळा केलेले पुरावे आणि पूर्ण झालेली चौकशी लक्षात घेता, आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची मागणी बचाव पक्षाने केली. मात्र, न्यायालयाने चारही आरोपींना २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता पुढील तपासात या प्रकरणातील कट आणि शस्त्रांच्या पुरवठ्याबाबत कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.