संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी
Tiger Shroff firing accused arrested : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासाला वेग आला असून, या प्रकरणात आतापर्यंत एकूण १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. गोळीबार करणाऱ्या तीन शूटरना घटनेनंतर अवघ्या १५ तासांत अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. आता या प्रकरणामागील संपूर्ण नेटवर्क, शस्त्रांची उपलब्धता आणि आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे. आरोपींना एक लाख रुपयांचे आगाऊ पैसे अनेक टप्प्यांत पाठवण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे या रकमेची व्यवस्था नेमकी कोणी केली, पैसे कोणाकोणाला देण्यात आले आणि या कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
१८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी फुटबॉलचा सामना खेळून टायगर श्रॉफ आपल्या कारने जात असताना त्याच्या वाहनावर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यातून टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सुरुवातीला जुहू पोलिसांकडे असलेला तपास नंतर मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला.
तीन शूटर १५ तासांत जेरबंद
या प्रकरणातील गोळीबार करणारे तीन संशयित शूटर ऋतिक कुमार ऊर्फ रोशन, रेहान आणि फूल सिंह यांना राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावर पुणे-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमधून ताब्यात घेण्यात आले. तिघेही नेपाळच्या दिशेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे. ऋतिक हा बिहारचा, तर रेहान आणि फूल सिंह हे हरियाणाचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. कोटा पोलिसांनी तिघांना पकडल्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले.
या अटकेनंतर तपासाचा केंद्रबिंदू केवळ गोळीबार करणाऱ्या शूटरपुरता मर्यादित राहिलेला नाही. त्यांना शस्त्रे कोणी पुरवली, मुंबईत राहण्याची व्यवस्था कोणी केली आणि हल्ल्यासाठी आर्थिक मदत कोणी केली, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
एक लाख रुपयांचे आगाऊ पैसे; आर्थिक व्यवहारांची तपासणी
गोळीबाराच्या कटासाठी आरोपींना एक लाख रुपये आगाऊ देण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. ही रक्कम एकाच वेळी न देता अनेक छोट्या हप्त्यांमध्ये पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पोलिसांकडून संबंधित आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेतला जात आहे.
पैसे कोणत्या खात्यांतून किंवा माध्यमांतून पाठवण्यात आले, त्यांचा मूळ स्रोत काय होता, तसेच प्रत्येक आरोपीला किती रक्कम मिळाली, याची माहिती गोळा केली जात आहे. या आर्थिक व्यवहारांच्या आधारे हल्ल्याचे नियोजन करणारे आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून देणारे लोक समोर येण्याची शक्यता आहे.
कुणाल, जतिन आणि समीरची कथित भूमिका तपासाच्या रडारवर
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी कुणाल, जतिन आणि समीर यांच्या कथित भूमिकेचीही चौकशी सुरू आहे.
हरियाणातील सोनीपतचा रहिवासी असलेला २१ वर्षीय कुणाल याने दहावीपर्यंत शिक्षण घेतल्याची माहिती आहे. त्याचे या प्रकरणातील इतर आरोपींशी असलेले संबंध आणि कथित भूमिका पोलीस तपासत आहेत.
जतिन याने कथितरीत्या शस्त्रांची व्यवस्था केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शस्त्रे आणण्यासाठी जतिन हा कुणाल आणि सुमित यांच्यासोबत अमृतसरला गेल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे शस्त्रांचा पुरवठा नेमका कोठून झाला आणि ती मुंबईपर्यंत कशी पोहोचली, याचा तपास महत्त्वाचा ठरत आहे.
समीर हा देखील सोनीपतचा रहिवासी असून, गोळीबार करणाऱ्या शूटरना तो ओळखत असल्याचा संशय आहे. तो मुंबईतील अंधेरी परिसरात येऊन तिन्ही शूटरसोबत राहिल्याची माहिती आहे. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी आरोपी वारंवार राहण्याची ठिकाणे बदलत असल्याचेही तपासात पुढे आले आहे.
गर्लफ्रेंडमार्फत मुंबईत पिस्तूल आणल्याचा संशय; लव्ह अँगलची चर्चा
या प्रकरणाच्या तपासात आता कथित लव्ह अँगलही समोर आला आहे. दिल्लीतील अटकसत्रादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, कुणालची कथित प्रेयसी राधा हिने त्याच्या सांगण्यावरून आपली सहकारी बबितासोबत दिल्लीहून मुंबईपर्यंत एक पिस्तूल पोहोचवल्याचा संशय आहे.
मुंबईत आल्यानंतर या दोघींच्या राहण्याची व्यवस्था कुणालनेच एका हॉटेलमध्ये केल्याची माहिती तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे. या पिस्तुलाचा गोळीबाराच्या घटनेशी नेमका काय संबंध आहे, तसेच त्याच्या वाहतुकीत आणखी कोण सहभागी होते, याचा तपास पोलीस करत आहेत.
शस्त्रे ट्रेनमधून मुंबईत कशी आली?
या प्रकरणात पोलिसांसमोर तीन महत्त्वाचे प्रश्न आहेत. पहिला म्हणजे, शस्त्रे ट्रेनमधून मुंबईत कोणी पाठवली आणि ती शूटरपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था कोणी केली? दुसरा म्हणजे, एक लाख रुपयांच्या आगाऊ रकमेचा मूळ स्रोत कोणता आणि हा पैसा कोणाकोणामध्ये वाटण्यात आला? तिसरा म्हणजे, गोळीबार करणारे शूटर, शस्त्रांची व्यवस्था करणारे आरोपी, त्यांना आश्रय देणारे आणि आर्थिक मदत करणारे यांच्यातील नेमके संबंध काय आहेत?
या सर्व धाग्यांची सांगड घालून प्रत्येक आरोपीची भूमिका निश्चित करण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करत आहेत. आतापर्यंत १० आरोपींना अटक झाली असली, तरी या हल्ल्यामागील संपूर्ण सूत्रधार कोण आणि त्याने हा कट कसा रचला, हे लवकरच समोर येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.