Ramayana Box Office: नितीश तिवारी दिग्दर्शित आणि रणबीर कपूर, साई पल्लवी, यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुचर्चित 'रामायण' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड अद्याप सुरूच आहे. ५ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दमदार ओपनिंगनंतर दिवाळीच्या आठवड्यात कमाईत काही चढ-उतार पाहायला मिळाला. मात्र, त्यानंतर चित्रपटाने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केले आहे. विशेष म्हणजे, प्रदर्शनाच्या अकराव्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी चित्रपटाने ७५ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे 'रामायण'ची बॉक्स ऑफिसवरील लोकप्रियता कायम असल्याचे दिसत आहे.
दुसऱ्या रविवारी 'रामायण' चित्रपटाने शनिवारपेक्षा जास्तची कमाई केली. अकराव्या दिवशी चित्रपटाने तब्बल ७५ कोटी रुपयांची कमाई केली. यामध्ये हिंदी भाषेतील व्हर्जनचा सर्वाधिक वाटा आहे. केवळ हिंदी व्हर्जनमधून या चित्रपटाने ५५ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. तर इतर भाषांमध्येही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कन्नड व्हर्जनमधून ५.७५ कोटी, मल्याळममधून ५ कोटी, तमिळमधून ४.७५ कोटी आणि तेलुगू व्हर्जनमधून ४.५० कोटी रुपयांची कमाई झाली आहे. या आकडेवारीनुसार, भारतातील चित्रपटाची एकूण ग्रॉस कमाई ९०९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
'रामायण' चित्रपटाची जादू केवळ भारतीय बॉक्स ऑफिसपुरती मर्यादित राहिलेली नाही. परदेशातही चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ट्रेड ट्रॅकर सॅकनिल्कच्या (Sacnilk) आकडेवारीनुसार, प्रदर्शनाच्या पहिल्या ११ दिवसांत चित्रपटाने परदेशात ४७०.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, अकराव्या दिवशी परदेशातील कमाईतही चांगली भर पडली. त्यामुळे भारत आणि परदेशातील कमाई मिळून 'रामायण'चे जागतिक कलेक्शन १३७९.५० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यासह चित्रपटाने रणवीर सिंगच्या 'धुरंधर' चित्रपटाच्या १३०७ कोटी रुपयांच्या कमाईचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
दरम्यान, 'रामायण' चित्रपटाला प्रेक्षकांसह मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांकडूनही पसंती मिळत आहे. टेलिव्हिजनवरील लोकप्रिय 'रामायण' मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी चित्रपटाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. तर, अभिनेत्री परिणीती चोप्रानेही सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाचे कौतुक केले आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चित्रपटातील व्हीएफएक्स आणि कथानकाची प्रशंसा केली. चित्रपट पाहताना आपणही त्या भव्य विश्वाचा एक भाग असल्यासारखे वाटल्याचे तिने म्हटले.