Paach Futaacha Bachchan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Paach Futaacha Bachchan: वारकरी परंपरेची अनोखी कथा मोठ्या पडद्यावर; 'पाच फुटाचा बच्चन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Paach Futaacha Bachchan: 'पाच फुटाचा बच्चन' हे गाजलेले एकपात्री नाटक आता चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विठ्ठल भक्ती, वारकरी परंपरा आणि तरुण कीर्तनकार मुलीची कथा सिनेमातून उलगडणार.

Shruti Vilas Kadam

Paach Futaacha Bachchan: गेल्या काही वर्षांत गाजलेल्या मराठी नाटकांचे रुपेरी पडद्यावर यशस्वी रूपांतर होताना पाहायला मिळाले आहे. आता या परंपरेत आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. प्रायोगिक एकपात्री नाटक म्हणून लोकप्रिय ठरलेले 'पाच फुटाचा बच्चन' आता चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचे पहिले टीझर पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून, त्याने सोशल मीडियावर चांगलीच उत्सुकता निर्माण केली आहे.

या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी केले आहे. तर राहुल कर्णिक आणि ऑर्फियस स्टुडिओज् यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे, नाटकातील आशय अधिक भव्य स्वरूपात प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी चित्रपटात तगडी कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे.

चित्रपटात गौरी नलावडे, शशांक शेंडे, चिन्मयी सुमित, क्षितिश दाते, किशोर कदम, आशय कुलकर्णी, पुष्कराज चिरपुटकर, ओमप्रकाश शिंदे, समीर पाटील आणि विनोद वणवे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. मात्र, 'पाच फुटाचा बच्चन' ही मध्यवर्ती भूमिका नेमकी कोण साकारणार, याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

प्रदर्शित झालेल्या टीझर पोस्टरमध्ये एक तरुण कीर्तनकार मुलगी आणि तिच्याभोवती विठ्ठलनामात दंग झालेले वारकरी दिसत आहेत. पोस्टरवरून हा चित्रपट विठ्ठल भक्ती, वारकरी संप्रदाय आणि कीर्तन परंपरा यांवर आधारित असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे ही कथा अध्यात्म, संस्कृती आणि भावविश्व यांचा सुंदर संगम घडवणारी असणार, अशी चर्चा रंगली आहे.

दिग्दर्शक कौस्तुभ देशपांडे यांनी सांगितले की, तीन वर्षांपूर्वी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या एकपात्री नाटकाचा पहिला प्रयोग सादर करण्यात आला होता. पहिल्याच प्रयोगाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मुंबई, पुणे आणि राज्यातील विविध शहरांमध्ये या नाटकाचे प्रयोग झाले. अनेक प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये नाटकाला नामांकने आणि पुरस्कारही मिळाले.

नाटकाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर त्यावर चित्रपट करण्याची कल्पना आकाराला आली. निर्माते राहुल कर्णिक यांनी या संकल्पनेला पाठिंबा दिल्यानंतर चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात करण्यात आली. सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, खडकवासला, पुणे आणि कोल्हापूर या ठिकाणी गेल्या वर्षभरात चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.

अभिषेक शेटे यांचे छायांकन, सौरभ प्रभुदेसाई यांचे संकलन, शंतनु-दिनेश यांचे ध्वनी आरेखन, निरंजन पेडगावकर यांचे संगीत आणि प्रदीप आवटे यांचे गीतलेखन लाभलेल्या 'पाच फुटाचा बच्चन' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नाटकातून प्रेक्षकांची मने जिंकणारी ही कथा आता मोठ्या पडद्यावरही तितकीच प्रभावी ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: निंबवली फाट्याजवळ उभ्या टेम्पोला भीषण आग

पावसाळ्यात मिळणारी कुड्याच्या फुलांची रानभाजी कशी बनवायची?

NEET मध्ये फक्त 11 गुणांनी हुकली सीट; अहिल्यानगरमध्ये 19 वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल

Cabinet Expansion : श्रीकांत शिंदेंना शिक्षण मंत्रालय मिळणार? शिंदेंसेनेच्या नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Health Care: रोज कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने खरंच बेली फॅट कमी होतं का? तज्ज्ञ काय सांगतात?

SCROLL FOR NEXT