केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) वाढीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जुलै २०२६ पासून लागू होणाऱ्या संभाव्य महागाई भत्ता वाढीची अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे देशातल्या १.२ कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचं लक्ष सरकारच्या निर्णयाकडे लागलं आहे. दिवाळीआधी या वाढीला मंजुरी मिळणार का, याबद्दल चर्चा सुरू आहे.
सध्या महागाई भत्त्यामध्ये ३ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय. पण केंद्र सरकारने अजून याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. सध्या महागाई भत्त्याचा दर ६० टक्के आहे. प्रस्तावित ३ टक्के वाढ मंजूर झाल्यावर तो ६३ टक्क्यांवर पोहोचू शकतो. याचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांसोबतच पेन्शनधारकांनाही महागाई मदतीच्या (DR) माध्यमातून मिळू शकतो.
दसऱ्याच्या आसपास महागाई भत्ता वाढीची घोषणा होईल, अशी कर्मचाऱ्यांना अपेक्षा होती. मात्र २१ ऑक्टोबरपर्यंत याबद्दल अधिकृत निर्णय जाहीर झालेला नव्हता. आता ८ नोव्हेंबर रोजी असलेल्या दिवाळीआधी सरकार घोषणा करणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. पण सरकारकडून निर्णयाची योग्य तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. याआधी एप्रिल २०२६ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यामध्ये २ टक्के वाढ मंजूर केली होती. त्यामुळे DA चा दर ५८ टक्क्यांवरून ६० टक्के झाला होता. ही वाढ १ जानेवारी २०२६ पासून लागू मानण्यात आली होती.
समजा, एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी ३०,००० रुपये आहे. सध्याच्या ६० टक्के DA नुसार त्याला १८,००० रुपये महागाई भत्ता मिळतो. दर ६३ टक्के झाल्यावर हा भत्ता १८,९०० रुपये होईल. म्हणजेच दरमहा ९०० रुपयांची वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे ५०,००० रुपये बेसिक सॅलरी असलेल्या कर्मचाऱ्याला सध्या ३०,००० रुपये DA मिळतो. संभाव्य वाढीनंतर तो ३१,५०० रुपये होऊ शकतो. म्हणजे दरमहा १,५०० रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळू शकतो.
जुलै २०२६ पासून वाढ लागू करण्यात मंजुरी मिळाल्यावर पात्र कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लागू कालावधीची थकबाकी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, थकबाकी कधी आणि कशा पद्धतीने दिली जाईल, याबद्दल अजून अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.