निवडणुका आल्या की आपण नेहमीच 'नोटा'ची चर्चा करत बसतो. निवडणुकादरम्यान दोन प्रकारच्या 'नोटा' चर्चेत असतात. एक चलनातल्या आणि दुसरा म्हणजे 'नोटा'चा अधिकार वापरण्याबाबतची... आपल्या प्राधान्यक्रमांकाचा, हिताचा विचार करणारा उमेदवार निवडून देण्यासाठी म्हणून 18 वर्षे पूर्ण झालेला मतदार रांगेत उभं राहत असतो. पण या उमेदवारांपैकी एकही उमेदवार आपापल्या मतदारसंघाच्या हिताचा विचार करु शकणारा नसेल, तर.... तर त्यासाठी आपल्याला 'नोटा'चा पर्यायही दिला गेला. 'नोटा'चा पर्याय निवडणं म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात असलेले सगळे उमेदवार अमान्य असल्याचं अधिकृतपणे जाहीर करणं...हा पर्याय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी वरकरणी चांगला वाटतो, हे वेगळं सांगायला नको. पण, यात एक प्रॉब्लेम सुद्धा आहे...
'नोटा' बिनकामाचाच !
निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले आपल्या समोरचे पर्याय बिनकामाचे आहेत, हे दाखवून देण्यासाठी 'नोटा' चा उपयोग केला गेला, तरी त्याचा कसलाही उपयोग होत नाही, त्यामुळं 'नोटा'चा वापर करणं म्हणजे आपल्या स्वतःबरोबरच प्रशासकीय यंत्रणेचा वेळ, पैसा वाया घालवणं असंच आहे. आपली कोणी तरी दखल घ्यावी, यासाठी आपण 'नोटा'चा उपयोग करत असू किंवा करण्याचा विचार करणार असू, तर त्याचा कसलाही उपयोग होणार नाही. फक्त 'नोटा'ची मतं मोजली जातील आणि त्यांची संख्या वाढेल...त्या पलिकडं काहीही होणार नाही. वास्तविक, 'नोटा' मतांची संख्या सर्वाधिक असेल, तर तिथं नव्यानं निवडणूक घेतली गेली पाहिजे, तेही उमेदवार बदलून... पण सध्या तरी तसं होत नाही. दुस-या क्रमांकाची मतं मिळवणारा उमेदवार विजयी घोषित करण्याची तरतूद सध्या आहे. त्यामुळं आजमितीला तरी 'नोटा' अवैध आणि बिनकामाचाच आहे.
मग 'नोटा'चा पर्याय हवाच कशाला ?
जसा मतदानानं आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे. तसा तो नाकारण्याचाही अधिकार मिळावा, म्हणून 'नोटा' चा जन्म झाला. पण प्रत्यक्षात आपण आपल्यासमोरचे पर्याय नाकारण्याची अधिकृत नोंद करण्यापलिकडं काहीच करत नाही. त्यामुळं एका अर्थानं आपण आपला आणि प्रशासकीय यंत्रणेचा वेळ, पैसा, श्रम वाया घालवतो. उपलब्ध उमेदवारांबाबतचा संताप व्यक्त करण्यासाठी 'नोटा' वापरण्याचा विचार करत असलो, तरी तो विचार किती निरर्थक आहे, हेच या सर्व प्रकारावरुन स्पट होतंय.
म्हणून मतदान करा..!
राजकीय पक्ष आणि उमेदवारांबाबतचा संताप व्यक्त करण्यासाठी आपण 'नोटा'चा पर्याय वापरु शकत असलो, तरी तो निरर्थक, निरुपयोगी ठरणार आहे. त्यामुळं एका अर्थी आपण आपलं मत वायाच घालवणार आहोत. पाच वर्षातून एकदा मिळणारी संधी अशी वाया घालवून चालणार नाही. आपलं मत अमूल्य आहे, ते असं वाया घालवून आता सध्या तरी काहीच साध्य होणार नाही. त्यामुळं मतदानाचा अधिकार असलेल्या एकानंही 'नोटा'चा विचारही मनात आणता कामा नये. भले, आपल्यासमोरचे पर्याय सक्षम नसले, तरी त्यातल्या त्यात 'दगडापेक्षा वीट मऊ' या म्हणीप्रमाणं पर्याय निवडाच, असा आग्रह आपण सगळ्यांनी धरला पाहिजे.
Web Title - Article On Nota
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.