Beed Farmer Saam TV
ऍग्रो वन

Beed: दोन खासदार, पाऊण डझन आमदार तरीही वाढला शेतकरी आत्महत्यांचा टक्का

प्रशासन आणि लोकप्रतिनिधी शेतकरी आत्महत्या रोखण्यात सपशेल अपयशी....

विनोद जिरे

बीड: 2 खासदार अन् पाऊण डझन आमदार असणाऱ्या बीड जिल्ह्यात (Beed District), शेतकरी आत्महत्येचं धक्कादायक भेसूर वास्तव समोर आलं आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा शेतकरी आत्महत्येचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कुठे विषारी औषध प्राशन करून तर कुठं गळफास घेऊन, दर तीन दिवसाला दोन शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. आणि या आत्महत्या रोखण्यात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सपशेल अपयशी ठरले आहेत.

जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडे पाहिलं जातं, म्हणूनच या शेतकऱ्याला बळीराजा म्हणून संबोधतात. मात्र हा बळीराजा आता, अर्ध्यावर डाव सोडून जात आहे. काळ्या आईची तहान भागवून, तिच्या कुशीतून इवलसं रोपटं उगवून, त्याला आपल्या तळहाताच्या फोडासारखं आणि वेळे प्रसंगी आपल्या मुलांपेक्षाही जास्त सांभाळून, हा शेतकरी या काळ्या आईच्या अंगावर एकप्रकारे घाम गाळून हिरवा शालू चढवतो. आणि त्यानंतर पिक बहरतात, फळे येतात आणि यातून सर्वांची भूक मिटते.

मात्र यावर आता गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणाचं विर्जन पडलंय. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजला आहे. आणि यामुळे रक्ताचं पाणी करून आणि तळहाताच्या फोडासारखे जपलेली उभी पिकं नेस्तनाबूत झाले. जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झालीय. पिकं तर वाहून गेलीचं मात्र अनेकांच्या शेतजमीनही वाहून गेल्या आहेत. त्यामुळं अनेकांची हरित जमीन बंजर झाली आहे. यामुळे पुढील काही वर्ष या जमिनीवर पिक येणं देखील मुश्कील होणार आहे.

विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलाचं शिक्षण असो की मुलीचं लग्न, बायकोची साडी असो की आई-वडिलांचं दुखणं, याच पिकांवर अवलंबून असतं. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर विरजण पडलं आणि एका क्षनात स्वप्नांची राखरांगोळी झाली. त्यामुळे आता मुलाचे शिक्षण, मुलीचे लग्न, आई वडिलांचे हॉस्पिटल आणि कुटुंबाचा गाडा कसा चालवावा ? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या डोक्यात घोंगावत आहे. विशेष म्हणजे या निसर्गाच्या संकटात सापडलेल्या लाखो शेतकऱ्यांना 2020 चा पिक विमा देखील अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे जगावं कसं? या चिंतेतून इथला शेतकरी हताश झालाय. आणि यातूनच आता शेतकरी आत्महत्येचा भेसूर वास्तव समोर आलय.

बीड जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या चं भेसूर वास्तव नेमकं काय आहे?

जानेवारी 2021 - 14 - जानेवारी 2022 - 18

फेब्रुवारी 2021 - 16 - फेब्रुवारी 2022 - 24

मार्च 2021- 19 - मार्च 2022- 29

एप्रिल 2021- 09 - एप्रिल 2022- 15

तर 2021 च्या 4 महिन्यात एकूण 58 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर 2022 च्या गत 4 महिन्यात 86 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं असून यंदा तब्बल 28 शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. तर याविषयी शेतकरी नेते भाई मोहन गुंड म्हणाले, की बीड जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याचं विदारक चित्र पाहून यावर बोलणं अवघड होत आहे. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याचा टक्का वाढतोय, शेतकऱ्यांपुढे पिक विमा, पिक कर्ज यासारख्या समस्या आहेत. त्यात निसर्गाचा लहरीपणा याला देखील तोंड द्यावे लागत आहे.

मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत. एखादी योजना आणली तर त्याचा ऊहापोह केला जातो. मात्र या शेतकरी आत्महत्याचा वाढता टक्का ही कोणाची जबाबदारी आहे, याची देखील जबाबदारी इथल्या सिस्टमनी आणि लोकप्रतिनिधींनी घ्यावी. असं माझं खुलं आव्हान त्यांना राहील. असं शेतकरी नेते भाई मोहन गुंड म्हणाले.

त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. जर या शेतकऱ्यांचा ऊस गेला नाही, तर आणखीन शेतकरी आत्महत्याचा टक्का वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच तोडगा काढावा. अशी मागणी शेतकरी नेते भाई मोहन गुंड यांनी केली आहे.

विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात राजकीय पुढाऱ्यांची मांदियाळी आहे. गल्लीत युवा नेता आणि गावात नेता असंच जणू काही चित्र जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात 2 खासदार आणि तब्बल पाऊण डझन आमदार आहेत. मात्र शेतकरी आत्महत्याचं चित्र अद्यापही कोणी बदलू शकलं नाही. विशेष म्हणजे या लोकप्रतिनिधी आणि नेत्यांना निवडणूक आली की हेच शेतकरी आठवतात. त्यांच्या भावनांशी खेळण्याचे काम हे नेतेमंडळी करतात, योजनांचा लाभ देऊ, प्रत्येक संकटात सोबत राहू, अशी आश्वासनांची खैरात वाटत गाजर दाखवतात.

मात्र शेतकरी आता मृत्यूला जवळ करत असताना, प्रशासन आणि कुठलाच लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरून आवाज उठवतांना दिसत नाही. त्यामुळेच बीड जिल्ह्यात आता शेतकरी आत्महत्येचा टक्का वाढत आहे. म्हणून आतापर्यंत शेतकरी आत्महत्या रोखण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासनासह लोकप्रतिनिधी यावर विचार करणार का ? आणि बीड जिल्ह्याला शेतकरी आत्महत्येचं लागलेले ग्रहण पुसणार का ? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Pune Crime : कोंढवा तरुणी अत्याचार प्रकरणात पुन्हा ३६० डिग्री टर्न, आरोप असलेल्या तरुणाला अटकच नाही

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

SCROLL FOR NEXT