Agriculture News : नाशिक येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीची १०० टक्के मालकी असलेल्या सह्याद्री फार्म्स पोस्ट हार्वेस्ट केअऱ लि. या कंपनीमध्ये ३१० कोटींची थेट परकिय गुंतवणूक युरोपातील गुंतवणूकदारांच्या समूहाने केली आहे. इंकोफिन- Incofin, कोरीस- Korys, एफएमओ- FMO आणि प्रोपार्को- Proparco यांचा या गुंतवणुकदारांमध्ये समावेश आहे. शेतकऱ्यांना आपला व्यवसाय अधिक फायदेशीर आणि शाश्वत स्वरूपात चालविण्याच्या सहयाद्री फार्म्सच्या भूमिकेवर या गुंतवणूकीमुळे शिक्कामोर्तब झाले आहे.
छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सुरुवातीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत (एंड -टू -एंड) सहाय्य प्रदान करणारे सह्याद्री फार्म्स हे ग्रामीण उद्योजकतेचे उत्तम उदाहरण आहे. सन २०१० मध्ये दहा शेतकऱ्यांच्या छोट्या गटाने एकत्र येत द्राक्षे युरोपात निर्यात केली. हाच छोट्या शेतकऱ्यांचा समूह आज सह्याद्री फार्म्सच्या रुपाने भारतातील आघाडीची फळे आणि भाजीपाला निर्यात आणि प्रक्रिया करणारी कंपनी बनली आहे. नऊ पिके, १८ हजार शेतकरी आणि ३१ हजार एकरहून अधिक क्षेत्रावर सह्याद्री फार्म्सचा विस्तार झाला आहे.
संलग्न शेतकऱ्यांना त्यांच्या आवडीच्या पिकांची निवड करण्यापासून पीक पद्धतीचे मार्गदर्शन, शेतकरी वापरत असलेल्या कृषी निविष्ठा (इनपूट्स), पीक काढणी आणि विक्री या सर्व टप्प्यांवर सह्याद्री फार्म्सची साथ असते. या प्रक्रियेत सह्याद्रीने फार्म्सने एक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना उच्च-उत्पन्न देणार्या पिकांच्या जाती, बियाणे, खते, कीडनाशके आदी कृषी निविष्ठा, प्रत्यक्ष (रिअल टाइम) हवामानाची माहिती आणि कृषिमाल बाजारपेठेत नेण्यापर्यंतची इत्थंभूत माहिती पुरविण्यात येते.
सह्याद्री फार्म्समुळे छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक व सामाजिक परिवर्तन होत आहे. श्री. नामदेव पवार हे त्यातलेच एक शेतकरी आहेत. ते सांगतात, ‘‘२०१२ मध्ये मी जवळपास शेतजमीन विकण्याचा निर्णय घेतला होता. अशा वेळी सह्याद्रीने मला आधार दिला व पुन्हा शेती व्यवसाय करण्यासाठी मी प्रेरीत झालो. सह्याद्रीमुळे माझ्या उत्पन्नात वाढ झाली. २०१४ मध्ये मी बँकेचे कर्जही फेडले.’’
सह्याद्री फार्म्सशी संलग्न असलेल्या अनिल डावरे यांचाही असाच अनुभव आहे. ते सांगतात, ‘‘माझ्याकडे एक एकरपेक्षा कमी शेती आहे. माझ्या शेतजमिनीच्या एका भागात घर आणि जनावरांचा गोठा आहे. सह्याद्रीसोबत जोडला जाऊन शेती केल्याने मी यशस्वी ठरलो. मुलाने उत्पादित केलेला शेतमाल परदेशात निर्यात होऊ शकतो, अशी माझ्या आईवडिलांनी कधीही कल्पना केली नव्हती. मात्र ते शक्य झाल्यानंतर त्यांच्या आनंदाला सीमा उरली नाही.”
कोरीस, एफएमओ, प्रोपार्को आणि इंकोफिन यांच्याकडून सह्याद्री फार्म्समध्ये केली जाणारी भांडवली गुंतवणूक ही शेतकऱ्यांच्या कंपनीची आणखी वाढ करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. सह्याद्री फार्म्सला प्रक्रियायुक्त फळे आणि भाजीपाला उत्पादनांची आपली क्षमता वृद्धींगत करायची आहे तसेच प्रक्रियापश्चात कचऱ्यापासून वीज निर्माण करण्यासाठी बायोमास प्लांट आणि पॅकहाऊससारख्या पायाभूत सुविधा वाढवायच्या आहेत. त्यासाठी या गुंतवणुकीचा उपयोग केला जाईल.
गुंतवणुकीच्या या प्रक्रियेत ‘अल्पेन कॅपिटल’ने सह्याद्री फार्म्ससाठी विशेष धोरणात्मक सल्लागार (स्ट्रँटेजिक ॲडव्हायजर) म्हणून काम केले.
शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांना उद्योजकांप्रमाणे व्यावसायिकदृष्ट्या विचारप्रवृत्त करणे ही सह्याद्री फार्म्सची मूळ संकल्पना आहे. प्रत्येक लहान आणि सीमान्त शेतकऱ्यांसाठी शेती फायदेशीर आणि व्यावहारिक व्यवसाय बनावा या उद्देशाने आम्ही एक शाश्वत, मोठ्या प्रमाणात वाढ होण्यासाठी सक्षम अशी संस्था विकसित करीत आहोत, असं सह्याद्री फार्म्सचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी सांगितलं आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.