Surabhi Jayashree Jagdish
पहिलं मूल झाल्यानंतर काही वर्षांनी अनेक कपल दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न सुरू करतात. मात्र यावेळी गर्भधारणा होण्यास वेळ लागतो. अशा वेळी ‘पहिल्यांदा लगेच गर्भधारणा झाली, मग आता अडचण का येतेय?’ असा प्रश्न अनेकांना पडतो. पण पहिल्यांदा सहज गर्भधारणा झाली होती, म्हणून दुसऱ्यांदाही तितक्याच सहजपणे गर्भधारणा होईल, असं नाही. वाढतं वय, शरीरातील बदल, वजन, हार्मोन्स, मासिक पाळीतील बदल आणि पुरुषांच्या प्रजनन आरोग्याचा परिणाम दुसऱ्या गर्भधारणेवर होऊ शकतो.
पहिल्या आणि दुसऱ्या बाळामध्ये काही वर्षांचं अंतर असू शकतं. या काळात स्त्री आणि पुरुष दोघांच्याही वयात वाढ होते. त्याचबरोबर आरोग्य, वजन आणि रोजच्या जीवनशैलीतही बदल होतात. या बदलांमुळे गर्भधारणेसाठी अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे पहिल्यांदा मूल झालं आहे म्हणून दुसऱ्यांदा गर्भधारणा होण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असं समजणं योग्य नाही.
दुसऱ्यांदा गर्भधारणा होण्यास उशीर होण्यामागे महिलेचं वाढतं वय हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं. वय वाढत जातं, तसं स्त्रीबीजांची संख्या आणि त्यांची क्वालिटी कमी होऊ लागते. यामुळे गर्भधारणा होण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो. तसंच गर्भपात होण्याचा धोकाही वाढू शकतो.
उदाहरणार्थ, एखाद्या महिलेला वयाच्या २७व्या वर्षी सहज गर्भधारणा झाली असेल, तर वयाच्या ३४ किंवा ३६व्या वर्षी दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न करताना अडचणी येऊ शकतात.
पुण्यातील बाणेरमधील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या फर्टिलिटी तज्ज्ञ डॉ. रश्मी निफाडकर यांनी सांगितलं की, पहिल्या गर्भधारणेनंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होऊ शकतात. त्यामुळे दुसऱ्यांदा गर्भधारणा होण्यास अडचण येण्यामागचं नेमकं कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे.
पहिल्या बाळानंतर काही महिलांना थायरॉईड, मधुमेह, वजन वाढणं, लठ्ठपणा किंवा पीसीओएससारख्या समस्या होऊ शकतात. शरीरातील हार्मोन्समध्ये बदल झाल्यामुळेही गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो. काही महिलांची मासिक पाळी अनियमित होते. काही वेळा स्त्रीबीज बाहेर पडण्याच्या प्रक्रियेत म्हणजेच ओव्ह्युलेशनमध्ये बदल होतात. अशा वेळी गर्भधारणा होण्यास अडचण येऊ शकते.
त्यामुळे पहिल्यांदा गर्भधारणा व्यवस्थित झाली होती म्हणून सध्या कोणतीही अडचण नसेल, असं गृहीत धरू नये. पहिल्या गर्भधारणेनंतर आरोग्यात काही बदल झाले आहेत का, हे तपासून पाहणं गरजेचं आहे.
गर्भधारणा होत नसल्यास त्यासाठी केवळ महिलेला जबाबदार धरणं चुकीचं आहे. पुरुषांच्या प्रजनन आरोग्यातील बदलांचाही गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो. वाढतं वय, वजन वाढणं, धूम्रपान, मद्यपान, ताणतणाव, काही औषधं आणि इतर आरोग्यविषयक समस्यांमुळे पुरुषांच्या स्पर्म्सच्या संख्येत, हालचालीत आणि क्वालिटीमध्ये बदल होऊ शकतात. स्पर्म्सची संख्या कमी असणं किंवा त्यांची हालचाल योग्य नसणं यामुळे गर्भधारणेत अडचण येऊ शकते.
डॉ. रश्मी निफाडकर यांच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या गर्भधारणेसाठी येणाऱ्या दाम्पत्यांपैकी सुमारे १० पैकी २ रुग्णांमध्ये पुरुषांच्या प्रजनन आरोग्याशी संबंधित समस्या आढळून येतात. त्यामुळे गर्भधारणा होण्यास अडचण येत असेल तर स्त्री आणि पुरुष या दोघांचीही तपासणी करणं आवश्यक आहे.
स्त्री आणि पुरुष दोघांचंही प्रजनन आरोग्य काळानुसार बदलत असतं. महिलांमध्ये अंडाशयातील स्त्रीबीजांचा साठा, स्त्रीबीज बाहेर पडण्याची प्रक्रिया, गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूब्समध्ये बदल होऊ शकतात. पुरुषांमध्ये स्पर्म्सची संख्या, हालचाल आणि क्वालिटी बदलू शकते. त्यामुळे पहिल्यांदा कोणत्याही अडचणीशिवाय गर्भधारणा झाली होती तरी दुसऱ्यांदा गर्भधारणा होण्यास वेळ लागू शकतो. अशा वेळी आधी मूल झालं आहे म्हणून वैद्यकीय तपासणी टाळू नये.
दुसऱ्यांदा गर्भधारणा होत नसल्यास डॉक्टर पहिल्या गर्भधारणेचा आणि प्रसूतीचा इतिहास जाणून घेतात. पहिल्या गर्भधारणेदरम्यान काही अडचणी आल्या होत्या का, प्रसूतीनंतर काही समस्या निर्माण झाल्या होत्या का, याची माहिती घेतली जाते. तसंच पोटाच्या खालच्या भागात म्हणजेच पेल्विक भागात संसर्ग झाला होता का, कोणती शस्त्रक्रिया झाली होती का किंवा इतर काही आरोग्यविषयक समस्या आहेत का, हेही तपासलं जातं.
दाम्पत्याच्या परिस्थितीनुसार डॉक्टर काही तपासण्या सुचवू शकतात. यामध्ये स्त्रीबीज बाहेर पडण्याची प्रक्रिया, अंडाशयातील स्त्रीबीजांचा साठा, गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूब्सची स्थिती तपासली जाऊ शकते. पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या, हालचाल आणि गुणवत्ता तपासण्यासाठीही चाचण्या केल्या जाऊ शकतात.
महिलेचं वय जास्त असेल, मासिक पाळी अनियमित असेल, पहिल्या गर्भधारणेदरम्यान काही समस्या आल्या असतील किंवा स्त्रीबीजांचा साठा कमी असण्याची शक्यता असेल तर फर्टिलिटी तज्ज्ञांचा वेळेत सल्ला घ्यावा. तसंच पुरुषांच्या शुक्राणूंच्या आरोग्याबाबत काही शंका असल्यास त्याकडेही दुर्लक्ष करू नये. गर्भधारणा होण्यास उशीर होत असेल तर त्यामागचं कारण शोधणं महत्त्वाचं आहे.
अनेक जोडप्यांना फर्टिलिटी तपासणी म्हटलं की आयव्हीएफ किंवा इतर महागड्या उपचारांची भीती वाटते. मात्र तपासणी केली म्हणजे आयव्हीएफ करावंच लागेल, असं नाही. या तपासण्यांमुळे गर्भधारणा होण्यात अडथळा नेमका कुठे आहे, हे समजण्यास मदत होते. स्त्रीबीज बाहेर पडण्याच्या प्रक्रियेत अडचण आहे का, अंडाशयातील स्त्रीबीजांचा साठा कमी आहे का, गर्भाशय किंवा फॅलोपियन ट्यूब्समध्ये काही समस्या आहेत का, अथवा पुरुषांच्या स्पर्म्सच्या क्वालिटीशी संबंधित अडचण आहे का, हे तपासलं जातं.
कारण स्पष्ट झाल्यानंतर त्यानुसार योग्य उपचार ठरवता येतात. प्रत्येक दाम्पत्याची परिस्थिती वेगळी असल्यामुळे उपचारही त्यांच्या गरजेनुसार दिले जातात.
पहिल्या बाळानंतर दुसऱ्या गर्भधारणेचा अनुभव प्रत्येक दाम्पत्यासाठी वेगळा असतो. काहींना लगेच गर्भधारणा होते तर काहींना त्यासाठी अधिक वेळ लागू शकतो. मात्र दुसऱ्यांदा गर्भधारणा होण्यास उशीर होत आहे म्हणजे आता मूल होणारच नाही असा त्याचा अर्थ नाही.
वाढतं वय, शरीरातील बदल, स्त्रीबीजांचा साठा, हार्मोन्स, जीवनशैली आणि पुरुषांचं प्रजनन आरोग्य अशा अनेक गोष्टींचा गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे समस्या दीर्घकाळ दुर्लक्षित करण्याऐवजी योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि गर्भधारणा होण्यात अडचण येण्यामागचं कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.