Surabhi Jayashree Jagdish
किडनी रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव बाहेर काढण्याचे काम करते. किडनीची कार्यक्षमता कमी झाली तर हे पदार्थ आणि द्रव शरीरात साचू लागतात. यामुळे पुढे शरीरात वेगवेगळी लक्षणं दिसू शकतात.
किडनीच्या आजाराची सुरुवात अनेकदा हळूहळू होते आणि सुरुवातीला ठळक त्रास जाणवत नाही. आजार वाढत गेल्यावर लघवीतील बदल, सूज, थकवा किंवा चवीत बदल यांसारखी लक्षणं दिसू शकतात. अशा बदलांकडे दुर्लक्ष न करता त्यांची कारणं तपासून घेणं गरजेचं आहे.
लघवी केल्यानंतर त्यावर वारंवार फेस किंवा बुडबुडे दिसत असतील तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. किडनीच्या फिल्टरमधून प्रोटीन लघवीत जाऊ लागल्यास लघवीला फेस येऊ शकतो. मात्र एक-दोन वेळा फेस दिसणं म्हणजे किडनीचा आजार आहे असं नाही.
किडनीची कार्यक्षमता खूप कमी झाल्यावर रक्तातील युरिया आणि इतर टाकाऊ पदार्थ वाढू शकतात. त्यामुळे काही लोकांच्या श्वासाला अमोनिया किंवा लघवीसारखा वास जाणवू शकतो. तोंडाची स्वच्छता चांगली असूनही असा वास सतत जाणवत असेल तर त्यामागचं कारण तपासणं आवश्यक आहे.
किडनीचं काम कमी झाल्यावर शरीरात काही टाकाऊ पदार्थ साचू शकतात आणि त्याचा चवीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अन्नाची चव बदलणं, तोंडाला कडू किंवा धातूसारखी चव येणं असे त्रास काही रुग्णांना जाणवतात.
किडनी शरीरात लाल रक्तपेशी तयार होण्यास मदत करणारे एरिथ्रोपोएटिन नावाचं हार्मोन तयार करते. किडनीचं काम कमी झाल्यावर हे हार्मोन कमी होऊ शकते आणि त्यामुळे रक्ताची कमतरता म्हणजे अॅनिमिया होऊ शकतो.
किडनी शरीरातील अतिरिक्त द्रव आणि मीठ योग्य प्रकारे बाहेर काढू शकत नसल्यास शरीरात पाणी साचू शकते. त्यामुळे सकाळी डोळ्यांभोवती आणि दिवसभरात घोटे किंवा पाय सुजलेले दिसू शकतात.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.