Surabhi Jayashree Jagdish
रोजच्या जीवनशैलीतील काही सवयी किडनीच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. कमी पाणी पिणं, जास्त मीठ खाणं आणि रक्तदाबाकडे दुर्लक्ष करणं यांसारख्या सवयी किडनीसाठी त्रासदायक ठरू शकतात. या सवयी वेळेत बदलल्यास किडनी निरोगी ठेवण्यासाठी मदत होऊ शकते.
दिवसभर खूप कमी पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. म्हणून दिवसभर नियमितपणे पाणी प्यावं आणि शरीराला पाण्याची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्यावी.
रक्तातील साखर दीर्घकाळ वाढलेली राहिल्यास किडनीतील बारीक रक्तवाहिन्यांचं नुकसान होऊ शकतं. त्याचप्रमाणे, उच्च रक्तदाबामुळे किडनीवर ताण येऊन तिच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रक्तातील साखर आणि रक्तदाब नियमित तपासून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे.
आहारात जास्त मीठ घेतल्याने रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाबामुळे किडनीतील रक्तवाहिन्यांचं नुकसान होऊ शकतं आणि किडनीचं काम बिघडू शकतं. त्यामुळे जेवणात वरून मीठ घेणं टाळावं आणि चिप्स, लोणची आणि जास्त मीठ असलेलं पॅकेज्ड पदार्थ कमी खावेत.
लघवीला जाण्याची इच्छा होत असतानाही वारंवार बराच वेळ लघवी रोखून धरणं टाळावं. काही परिस्थितींमध्ये ब्लॅडर पूर्णपणे रिकामा न होणं किंवा लघवीचा प्रवाह अडणं यामुळे किडनीच्या धोका वाढू शकतो. त्यामुळे लघवीला आल्यावर शक्यतो वेळेत लघवीला जाऊन यावं.
फास्ट फूड आणि पॅकेटमधील अनेक पदार्थांमध्ये मीठ आणि इतर घटकांचं प्रमाण जास्त असू शकतं. अशा पदार्थांचं वारंवार आणि जास्त सेवन केल्याने रक्तदाब वाढण्याचा आणि किडनीच्या आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका वाढू शकतो.
इबुप्रोफेन किंवा अॅस्पिरिन यांसारखी पेनकिलर औषधं दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा आणि दीर्घकाळ घेतल्यास किडनीमध्ये होणारा रक्तप्रवाह कमी होऊ शकतो. त्यामुळे दीर्घकाळात किडनीला नुकसान पोहोचण्याचा धोका वाढतो.
रोज पुरेशी झोप न मिळाल्याने शरीराच्या कामकाजावर आणि रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो. सतत तणावात राहिल्यानेही रक्तदाब वाढू शकतो आणि दीर्घकाळात किडनीच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.