Surabhi Jayashree Jagdish
सध्या विदर्भात उकाड्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलीये. तापमान ४० अंशांच्या पुढे जात असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे अनेक जण विकेंडला किंवा सुटीच्या दिवशी थंड हवामान असलेल्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करतायत.
अकोल्याजवळही अशी काही सुंदर ठिकाणं आहेत, जिथे निसर्ग, थंड हवा आणि शांत वातावरणाचा आनंद घेता येतो. ही ठिकाणं कोणती आहेत ती पाहूयात.
चिखलदरा हे अकोल्यापासून सुमारे ११० ते १२० किलोमीटर अंतरावर आहे. हे विदर्भातील एकमेव हिल स्टेशन मानलं जातं आणि याठिकाणी वर्षभर आल्हाददायक वातावरण असतं.
गावीळगड किल्ला हा चिखलदऱ्याजवळ डोंगररांगांमध्ये वसलेला ऐतिहासिक किल्ला आहे. उंच भागात असल्यामुळे याठिकाणी सतत गार वारे वाहताना जाणवतात. किल्ल्यावरून दिसणारं निसर्गदृश्य पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करतं.
सेमाडोह हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात वसलेलं शांत ठिकाण आहे. दाट जंगल आणि टेकड्यांमुळे याठिकाणी तापमान तुलनेने कमी जाणवतं. निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंगची आवड असलेले पर्यटक येथे खास भेट देतात.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा विदर्भातील अत्यंत प्रसिद्ध वनक्षेत्रांपैकी एक आहे. जंगलातील हिरवाई आणि डोंगराळ भागामुळे याठिकाणी वातावरण गार राहतं. उन्हाळ्यातही याठिकाणी सकाळ आणि संध्याकाळी आल्हाददायक थंडावा अनुभवायला मिळतो.
शहानूर धरण परिसर अकोल्याजवळील सुंदर पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जातो. धरणाच्या पाण्यामुळे आणि सभोवतालच्या हिरवाईमुळे याठिकाणी वातावरण प्रसन्न राहतं.