Shreya Maskar
आपल्या रोजच्या दिवसाची सुरुवात अनेकजण चहाच्या कपाने करतात. साधारणपणे १० ते २० रुपयांना मिळणारा चहा जगात कोट्यवधी रुपयांना विकला जातो. प्रत्येक चहाप्रेमींना माहितच असायला हवे की, जगातील सर्वात महागडा चहा कोणता आणि तो कितीला मिळतो.
जगातील सर्वात महागडा चहाचे नाव 'दा होंग पाओ (Da Hong Pao)' असे आहे. हा चहा त्याच्या खास सुगंधासाठी, वेगळ्या चवीसाठी आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखला जातो.
दा होंग पाओ हा चीनमधील फुजियान प्रांतातील वुई पर्वतरांगांमध्ये तयार होणारा खास प्रकारचा ओलोंग चहा आहे. चिनी भाषेत 'दा होंग पाओ' या नावाचा अर्थ 'मोठा लाल झगा' (Big Red Robe) असा होतो.
या चहाच्या मूळ झाडांपासून मिळालेल्या पानांना ऐतिहासिक लिलावात प्रचंड किंमत मिळाली होती. २००५ मध्ये केवळ २० ग्रॅम मूळ दा होंग पाओ चहा २ लाख ८ हजार चिनी युआनला विकला गेला. चहाची किंमत सुमारे $1.2 दशलक्ष प्रति किलोग्राम (सुमारे ₹9 कोटी प्रति किलोग्राम) आहे.
लिलावाच्या किमतीनुसार एक किलो चहाची गणिती किंमत १.०४ कोटी युआन होते. आजच्या विनिमय दरानुसार ही रक्कम साधारण १२ ते १३ कोटी रुपयांच्या आसपास होऊ शकते.
दा होंग पाओची केवळ सहा मूळ झाडे (Mother Trees) प्रसिद्ध आहेत. ही झाडे चीनमधील वुई पर्वतरांगांमध्ये आहेत. या मूळ झाडांपासून मिळणाऱ्या चहाचे उत्पादन अत्यंत मर्यादित होते. त्यामुळे त्याची किंमत वाढली.
चीन सरकारने २००६ मध्ये मूळ सहा झाडांवरील व्यावसायिक चहाची पाने तोडण्यावर बंदी घातली.या प्राचीन झाडांचे संरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे चहा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध नाही.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.