ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुगाचे बिरडे ही एक सोपी, पौष्टिक आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन भाजी आहे. ग्रामीण भागात भाकरीसोबत खास करून ही डिश बनवली जाते.
मुगाचे दाणे, हिरवी मिरची, कांदा, आले, लसूण, कढीपत्ता, मोहरी, हिंग, हळद, मीठ, तेल, कोथिंबीर आणि पाणी इ. साहित्य लागते.
तुमच्या अंदाजानुसार, एका भांड्यात मुग घ्या. ते स्वच्छ धुवून त्यात पाणी टाका आणि रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी मुगाला मोड आल्यावर ते सोलून घ्या. यामुळे मुग लवकर शिजतात आणि पचनास हलके होतात.
एक मोठी कढई घ्या. कढईत तेल गरम करून मोहरी घाला. मोहरी तडतडल्यानंतर हिंग, कढीपत्ता, लसूण, आले आणि हिरवी मिरची घालून छान परतून घ्या. त्यानंतर कांदा घालून कांदा गुलाबी होईपर्यंत परतवून घ्या.
तयार केलेल्या फोडणीत हळद आणि मसाले घालून लगेच त्यात सोललेले मुग टाका आणि हलक्या हाताने परतून घ्या. त्यात थोडे पाणी घाला. त्यावर झाकण ठेवून एक उकळी येऊ द्या.
मध्यम आचेवर 7 ते 10 मिनिटे बिरडे उकळवून घ्या. पातळ आमटीसारखी कन्सिस्टन्सी ठेवा म्हणजे चव छान लागते.
तुमच्या चवीनुसार शेवटी मीठ घाला. तसेच आंबट गोडपणा हवा असल्यास कोकम किंवा चिंचेचा कोळ घातला तरी चालेल. टाकल्यानंतर एकदा बिरडे ढवळून घ्या आणि गॅस बंद करा. यामुळे बिरड्याला हलकी आंबट चव येते.
गरमागरम मुगाचे बिरडे ज्वारी, बाजरीची भाकरी किंवा भातासोबत सर्व्ह करा. वरून कोथिंबीर घातल्यास चव आणि सुगंध वाढतो.