Shraddha Thik
आपण दिवसभर उभे राहतो त्यामुळे आपले पाय मजबूत आणि कणखर असणं गरजेचं असतं, मात्र कधी कधी आपल्या पोटऱ्या दुखतात तर कधी गुडघे.
कधी कधी आपल्या टाचा दुखतात, परंतू टाचदुखी ही बहुतांश महिलांमध्ये अतिशय सामान्य समस्या असल्याचे दिसते. टाचा दुखल्या तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.
घरात दिवसभर उभे राहून काम करताना किंवा बाहेर वावरताना आपल्याला हे लक्षात येत नाही. मात्र अनेकदा सकाळी उठल्यावर आपल्याला टाच किंवा पाय जमिनीवर टेकवताच कळ येते.
बरेच दिवस आपण हे दुखणे अंगावर काढतो, मात्र कालांतराने हा त्रास वाढत जातो. पूर्वी टाचदुखीची समस्या वयाच्या चाळीशीनंतर सुरू व्हायची मात्र आता अगदी लहान वयातील मुलींनाही टाचदुखीचा त्रास उद्भवतो.
रात्री झोपताना टाचांना बर्फाने शेकणे हा सर्वात सोपा उपाय आहे. यामुळे टाचेच्या आतल्या स्नायूंना आराम मिळून टाचदुखी काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकते.
टाचांना तेलाने मसाज केल्यासही चांगला आराम मिळू शकतो. त्यामुळे टाचांना नियमितपणे शक्य तेव्हा तेल कोमट करुन मसाज करायला हवा. यासाठी मोहरीचं तेल वापरलं तरी चांगला फायदा होतो.
गरम पाण्यात मीठ घालून त्यामध्ये टाचा बुडवून ठेवल्यास त्याचाही टाचदुखी कमी होण्यास फायदा होतो.