ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दिवसभर अॅक्टिव्ह आणि निरोगी राहण्यासाठी 8 तासांची झोप आवश्यक आहे हे आपण अनेकदा ऐकतो. कारण चांगली झोप आपल्या शरीरासाठी आणि मेंदूसाठी फायदेशीर असते.
जेव्हा आपण झोपतो तेव्हा शरीराच्या पेशी दुरुस्त होतात. स्नायूंना आराम मिळणे, दुखापती बरे होणे आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होणे, या सर्व प्रक्रिया झोपेदरम्यान घडतात. जर झोप पूर्ण झाली नाही तर थकवा कायम राहतो आणि शरीर हळूहळू कमकुवत होऊ लागते.
झोपेदरम्यान, मेंदू दिवसभर घडलेल्या गोष्टींवर प्रोसेस करतो. त्यामुळे आपल्याला भावनिकदृष्ट्या स्थिर राहण्यास आणि निर्णय घेण्यास मदत होते. कमी झोपेमुळे चिडचिड, गोंधळ आणि लक्ष केंद्रीत करण्यास अडचण येते.
झोपेच्या वेळी, मेंदू नवीन गोष्टी लक्षात ठेवण्याचे आणि जुने अनुभव साठवण्याचे काम करतो. हे विद्यार्थी आणि काम करणाऱ्या लोकांसाठी खूप महत्वाचे आहे.
चांगली झोप घेतल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. झोपेचा अभाव वारंवार सर्दी, ताप आणि इतर आजारांना कारणीभूत ठरु शकतो.
चांगली झोप तणाव, चिंता आणि नैराश्य यासारख्या समस्या कमी करण्यास मदत करते. त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते.
झोपेच्या वेळी, शरीर योग्य प्रमाणात ग्रोथ हार्मोन्स, इन्सुलिन आणि भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स तयार करते. झोपेच्या कमतरतेमुळे या हार्मोन्सच्या पातळीत असंतुलन येऊ शकतो. ज्यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका वाढतो.