Bharat Jadhav
तज्ज्ञांच्या मते जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुमचा मेंदू आणि मज्जासंस्था शरीराला 'अलर्ट मोड'मध्ये आणतात. यामुळे शरीरात ॲड्रेनालाईनचे प्रमाण अचानक वाढते आणि याच कारणामुळे अशी शारीरिक रिअॅक्शन दिसून येते.
राग आल्यावर हातांना थरथराट होणे, शरीर कांपणे, हृदयाचे ठोके वेगाने पडणे, घाम येणे किंवा श्वासोच्छवासाचा वेग वाढणे अशी लक्षणे दिसून येऊ शकतात.
अनेकदा शरीराच्या सामान्य तणाव-प्रतिसादाचा (stress response) परिणाम असते. राग ही एक भावनिक अवस्था असली, तरी तिचा प्रभाव केवळ मनापुरता मर्यादित नसतो, ती मेंदू, मज्जासंस्था, हृदय आणि स्नायूंमध्येही बदल घडवून आणू शकते.
NCBI नुसार जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुमचे शरीर या स्थितीकडे एक गंभीर किंवा तणावपूर्ण प्रसंग म्हणून पाहते. यामुळे स्वयंचलित मज्जासंस्थेचा 'सिम्पॅथेटिक' विभाग सक्रिय होतो, ही तीच प्रणाली आहे जी तणावपूर्ण परिस्थितीत शरीराला त्वरित प्रतिक्रिया देण्यासाठी तयार करत असते .
जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या परिस्थितीकडे राग निर्माण करणारी परिस्थिती म्हणून पाहते, तेव्हा मेंदू या भावनिक माहितीवर प्रक्रिया करतो. शरीराला प्रतिसाद देण्यासाठी सज्ज करतो. या प्रक्रियेत स्वायत्त मज्जासंस्था महत्त्वाची भूमिका बजावते. सम्पॅथिटिक मज्जासंस्था सक्रिय होते, तेव्हा हृदय गती आणि रक्तदाबात बदल होतो.
मेडिकलन्यूजटुडेनुसार, रागाच्या किंवा अचानक आलेल्या तणावाच्या क्षणी, शरीर 'लढा किंवा पळा' प्रतिसादासाठी तयार होते. या अवस्थेत, ॲड्रेनालाईन ज्याला एपिनेफ्रिन असेही म्हणतात. तणावाशी संबंधित इतर रसायनांची क्रिया वाढू शकते. ॲड्रेनालाईन शरीराला जलद कृती करण्यासाठी तयार करते.
यामुळे हृदयाचे कार्य आणि रक्ताभिसरण यामध्ये बदल होतात, तसेच स्नायूंच्या हालचालींमध्येही फरक पडतो. तीव्र रागामुळे शरीरावर खूप ताण येतो, तेव्हा स्नायूंमध्ये नकळत हलके थरथरणे किंवा कंप जाणवू शकतो. म्हणूनच, रागावलेल्या अवस्थेत काही लोकांचे हात थरथरू लागतात. पाय लटलटू लागतात.