Bharat Jadhav
गरोदरपणानंतर अनेक महिलांचे वजन लक्षणीयरीत्या वाढते. पण असे का घडते, हे तुम्हाला माहीत आहे का? फरिदाबाद येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या संचालिका, डॉ. नीती कौतिश, यामागील कारणे सांगितली आहेत.
हे शरीरातील नैसर्गिक बदल आणि बाळंतपणानंतर जीवनशैलीत झालेल्या बदलांचे परिणाम असू शकतात. अनेक महिलांना बाळंतपणानंतर वाढलेले वजन कमी करणे कठीण जाते. यामागील कारण हे हार्मोनल बदल, अपुरी झोप, तणाव आणि शारीरिक हालचालींमध्ये झालेली घट.
गर्भावस्थेदरम्यान बाळाच्या वाढीस मदत करण्यासाठी आणि स्तनपानासाठी शरीर अतिरिक्त चरबी साठवून ठेवते. प्रसूतीनंतर ही अतिरिक्त चरबी लगेच नाहीशी होत नाही. यासह इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनसारख्या हार्मोन्सच्या पातळीत होणारे बदल भूक, चयापचय क्रिया आणि शरीर ज्याप्रकारे चरबी साठवते, यांवर परिणाम करू शकतात.
काही स्त्रियांना बाळंतपणानंतर थायरॉईड ग्रंथीला सूज येऊ शकते. या स्थितीला 'पोस्टपार्टम थायरॉईडिटिस' असे म्हणतात, ज्यामुळे वजन वाढू शकते.
बाळंतपणानंतर स्त्रीच्या दैनंदिन जीवनशैलीतही मोठे बदल होतात. नवजात बाळाची काळजी घेताना अनेकदा आईला पुरेशी झोप मिळत नाही, तसेच तिला नियमित जेवण किंवा व्यायामासाठी वेळ काढणेही कठीण जाऊ शकते.
पुरेशी झोप न मिळाल्यास भूक नियंत्रित करणारे हार्मोन प्रभावित होऊ शकतात. यामुळे वारंवार भूक लागणे. खाण्याची इच्छा वाढणे असे प्रकार घडू शकतात. यासह मानसिक तणाव आणि बाळंतपणानंतर होणारे भावनिक बदलही खाण्याच्या सवयींवर परिणाम करू शकतात.
स्तनपानामुळे शरीराची ऊर्जेची गरज वाढते, परंतु याचा अर्थ असा नाही की प्रत्येक स्त्रीचे वजन कमी होईल. काही स्त्रियांचे वजन स्तनपानाच्या काळात कमी होऊ शकते, तर काहींचे वजन वाढलेले राहू शकते. बाळंतपणानंतर वजन कमी करण्यासाठी घाई करू नये.
महिलांनी 'क्रॅश डाएट' किंवा अतिव्यायाम करणे टाळावे. त्याऐवजी, संतुलित आहार घेणे, भरपूर पाणी पिणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन हळूहळू शारीरिक हालचाली सुरू करणे अधिक चांगले ठरेल.
वरील लेख हा फक्त माहितीसाठी आहे, आरोग्याविषयी काही समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.