Surabhi Jayashree Jagdish
एक व्यक्ती त्याच्या आयुष्याचा जवळपास एक तृतीयांश भाग झोपेत घालवतो. दिवसभराचा ताण कमी कऱण्यासाठी आणि शरीराला आराम मिळवण्यासाठी झोप गरजेची असते. आपण झोपेत असताना मेंदू त्याचं काम करत असतो.
झोपेत असताना आपल्याला स्वप्न असतात. यामधील काही स्वप्न ही भीतीदायक तर काही स्वप्न ही आनंदाची असतात. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की, आपल्याला भीतीदायक स्वप्न का पडतात?
झोपेची रचना समजून घेतल्याशिवाय स्वप्नांचं विज्ञान समजू शकत नाही. झोप प्रामुख्याने नॉन-आरईएम (Non-REM) आणि आरईएम (REM – Rapid Eye Movement) अशा दोन प्रकारांत विभागली जाते.
रात्री झोप लागल्यानंतर शरीर प्रथम नॉन-आरईएम टप्प्यात जाते. यामध्ये तुमच्या शरीराची झीज भरून काढणं, ऊर्जेची बचत होणं, पेशींची दुरुस्ती अशी कामं सुरु असतात.
यानंतर झोपेचं चक्र आरईएम टप्प्यात जात असून यामध्ये डोळ्यांच्या बाहुल्या काहीशा वेगाने हालचाल करतात. मेंदूची विद्युत क्रिया खूप एक्टिव्ह होत असून या काळात भावनिक स्वप्नं पडण्याची शक्यता जास्त असते.
अमिग्डाला हा मेंदूचा भाग भीती आणि भावनांशी संबंधित असतो. वाईट स्वप्नं पडताना हा भाग जास्त एक्टिव्ह होतो. त्यामुळे स्वप्नांमध्ये भीती, धोक्याची भावना आणि असुरक्षितता अधिक जाणवते.
ज्यांना भूतकाळात काही धक्कादायक अनुभव आले आहेत, त्यांना वाईट स्वप्नं जास्त पडू शकतात. मेंदू त्या आठवणी पुन्हा पुन्हा प्रोसेस करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तीच घटना किंवा त्यासारखी दृश्यं स्वप्नात दिसतात.
झोपेच्या वेळी मेंदूत विविध रसायनं आणि हार्मोन्सचं संतुलन बदलत असते. काही वेळा या बदलांमुळे इमोशन्स तीव्र होतात. त्यामुळे स्वप्नं अधिक जिवंत आणि कधी कधी भीतीदायक वाटतात.