Bharat Jadhav
कोणत्याही गोष्टीवरून रडू येणं म्हणजे कमकुवतपणा नाहीये. रडणे ही मानवी भावनिक अभिव्यक्ती आहे.
काहींना लगेच रडू येत असेल तर त्याला एक कारण नसते. त्यामागे अनेक मानसिक, सामाजिक आणि परिस्थितीजन्य कारणे असू शकतात. म्हणून लवकर रडू येतं म्हणजे तुमच्यात काहीतरी कमी आहे , असा होत नाही.
प्रत्येक व्यक्ती भावना एकाच पद्धतीने अनुभवत नसतो. काहींना आनंद, दुःख, भीती, प्रेम, सहानुभूती किंवा निराशा या भावना अधिक तीव्रतेने जाणवू शकतात. म्हणजेच एखाद्याला दुसऱ्याचे दुःख पाहून स्वतःलाही खूप वाईट वाटते. किंवा चित्रपट पाहताना अनेकांना रडू येते.
कधी कधी आपण ज्या कारणासाठी रडतो, ते खरे कारण नसते. दिवसभर कामाचा ताण, घरातील जबाबदाऱ्या, नात्यांमधील समस्या, आर्थिक चिंता किंवा सततचे विचार मनात साचत राहतात. त्याकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे एखादी घटना घडली की अचानक डोळ्यातून अश्रू येऊ लागतात.
मनात साचलेल्या भावनांचा भार मोठा असू शकतो. संशोधनामध्ये प्रौढ व्यक्तींच्या रडण्याशी एकटेपणा, असहायता आणि मानसिक ओव्हरलोड यांसारख्या अनुभवांचा संबंध आढळलाय.
लहानपणापासून ऐकलं असेल लोक काय म्हणतील म्हणून अनेकजण आपल्या भावना दाबण्यास सांगतात. यामुळे भावना व्यक्त करण्याऐवजी त्या दाबून ठेवण्याची सवय लागू शकते. त्यामुळे बराच काळ स्वतःला आवरून ठेवल्यानंतर एखाद्या क्षणी रडू येणे ही भावनिक प्रतिक्रिया असू शकते.
रडल्याने प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक परिस्थितीत लगेच मानसिक आराम मिळेलच असे नसते. काही संशोधनांमध्ये रडण्याचा परिणाम व्यक्ती, परिस्थिती आणि इतरांकडून मिळणाऱ्या आधारावर अवलंबून असल्याचे दिसते.
सर्वप्रथम स्वतःला दोष देऊ नका. जर वारंवार रडू येत असेल, त्यासोबत सतत उदास वाटत असेल, दैनंदिन कामांमध्ये रस कमी झाला असेल तर मानसशास्त्रज्ञ किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञाशी बोलणे योग्य ठरू शकते.